तत्काळ रुजू होण्याचे राज्य शासनाचे आदेश
रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर कमी होत असला तरीही बाधितांची संख्या म्हणावी तशी कमी झालेली दिसत नाही. चाचण्या वाढविणे आणि लसीकरण कार्यक्रम वेगाने राबविण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागासह जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिमतीला पदनियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकार्यांची टिम राज्य शासनाकडून नियुक्त केली आहे. या चौघांनाही तत्काळ रत्नागिरीत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. बबिता कमलापूरकर यांच्या जागी प्रतिनियुक्तीने जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. अनिरुध्द आठल्ये यांची नियुक्ती केली गेली आहे. तसेच बीडच्या जिल्हा माता बाल व संगोपन अधिकारी डॉ. स्वाती बाळकृष्ण कांबळे यांची जिल्हा रुग्णालय येथे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) म्हणून नियुक्ती केली आहे. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून वाशिम येथील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख, कोविड व्यवस्थापनेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सहकार्य म्हणून नाशिकचे डॉ. गोविंद चौधरी, पुणे येथील सहायक संचालक डॉ. दिलीप माने यांचा समावेश आहे. या चारही अधिकार्यांनी दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे आणि तसा अहवाल संबंधितांना सादर करावा अशा सुचना आरोग्य संचालनालयाने केल्या आहेत.
आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे चाचण्या वाढविणे, लसीकरण कार्यक्रम राबविणे आणि कोरोनासंदर्भातील प्रशिक्षण देणे यादृष्टीने नव्याने पदनियुक्त केलेल्या अधिकार्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये माता, बाल व संगोपन अधिकारी असून त्यांची नियुक्ती जिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. या अधिकार्यांमुळे नियोजन करण्यामध्ये कार्यरत असलेल्या अधिकार्यांना निश्चित फायदा होणार आहे.