रत्नागिरी : पुढील पंधरा दिवसांत दररोज दहा ते बारा हजार कोरोना चाचण्या करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासन हाती घेणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून जी गावे चाचणीला विरोध करतील त्यांच्या विरोधात तहसीलदारांमार्फत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. गरज पडल्यास पुन्हा सात दिवसांच्या टाळेबंदी संदर्भात यावेळी चर्चा झाली आहे.
कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह आरोग्य अधिकारी उपस्थित होते. त्यांनी प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधला.
बाधित सापडलेल्या गावांसह आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांच्या सरसकट चाचण्या करण्यावर भर दिला जाणार आहे. चाचण्यांना विरोध दर्शवला जात असून काहींनी तशी पत्रेही दिली आहेत. लांजा, खेड, दापोलीत असे प्रकार अधिक होत आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेतली असून संबंधितांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यासाठी तहसीलदारांनी पोलिसांची मदत घ्यावयाची आहे.
जिल्ह्यात सध्या प्रतिदिन पाच हजार चाचण्या होत आहेत. त्यात वाढ करुन दररोज १० ते १२ हजार चाचण्यांचे लक्ष्य निश्चित केले आहे. यात ५० टक्के आरटीपीसीआर आणि ५० टक्के अँटिजेन चाचण्या होतील. अडीच हजारांहून अधिक आरटीपीसीआर चाचण्या प्रतिदिन करण्याची क्षमता प्रयोगशाळेची आहे. ती वाढविण्यासाठी मुंबईतील प्रयोगशाळा शासन निश्चित करून देणार आहे. खेड, दापोली, मंडणगडातील स्वॅब मुंबईला नियमित वाहनाने तपासण्यासाठी जातील.
व्यावसायिक तत्त्वावर त्या प्रयोगशाळा काम करत असल्याने एका दिवसात अहवाल मिळेल. यापूर्वी माय लॅबचा दिलासा होता; परंतु अहवाल उशिरा देणे, काही लपवून ठेवणे यासारख्या तक्रारी आल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात चाचण्यांसाठी पथक तयार केली जाणार आहेत. नव्याने रुग्णवाहिका आल्यामुळे रुग्ण वाहतूक करणे शक्य होईल. यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. संस्थात्मक विलगीकरणाची गावपातळीवर व्यवस्था करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. काही नियमित कर्मचारी चालढकल करत असून काहींनी कोरोनाचे काम करण्यास नकार दिला आहे. त्यांनाही कडक समज दिली जाणार आहे.