गुहागर : प्रसिध्दीपासून कोसो मैल दूर राहून समाजासाठी अहोरात्र धडपणारे विनायक शंकर ओक तथा विनुमास्तर, ओक गुरुजी यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंड असा परिवार आहे.
गुहागर तालुक्यातील वेळंब येथे रहाणारे विनायक शंकर ओक प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे संपूर्ण तालुका त्यांना ओक गुरुजी, विनुमास्तर या नावाने ओळखत असे. सामाजिक कामाची आवड असलेले ओक गुरुजी नोकरीनिमित्त ज्या ज्या गावात गेले तिथले ग्रामस्थ बनुन राहीले. देह आणि देव यांच्यामध्ये देश लागतो. त्या देशासाठी आपण झिजलं पाहिजे (स्वा. सावरकर) या विचारांप्रमाणे विनुमास्तर अखंड कार्यरत होते. गावातील, तालुक्यातील अनेकांच्या अडचणी सोडवल्या. पण कधीही त्याची वाच्यता केली नाही. मोडी लिपी येत असल्याने जुन्या दस्ताऐवजांचे मराठीत रुपांतर करण्याचे काम त्यांनी केले. गोरगरीबांकडून अशा कामाचे त्यांनी कधी पैसे घेतले नाहीत.
वेळंब गावात आज नावारुपाला आलेले वाचनालय उभे करण्यात ओक गुरुजींचा मोठा वाटा आहे. या वाचनालयासाठी त्यांनी अनेकांकडे हात पसरले. तालुक्यात फिरुन पुस्तके गोळा केली. गावात कोणी पाहुणा आला की त्याला गाठून ओक गुरुजी वाचनालयात घेवून जात असतं. वाचनालयाची माहिती, उद्देश सांगून मदतीसाठी आवाहन करीत. शब्दश: वाचनालयासाठी त्यांनी झोळी खांद्याला लावली होती.
निवृत्त झाल्यानंतर गुहागर तालुक्यातील ब्राह्मण समाजाचे संघटन करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. हा विषय समाजापर्यंत पोचावा म्हणून स्व खर्चाने तब्बल दोन वर्ष ते प्रवास करुन तालुक्यातील समाजबांधवांची भेट घेतली. पण 2000 साली ब्राह्मण सहाय्यक संघाची स्थापना झाली तेव्हा अध्यक्ष पद घेण्याचे नाकारले. एक विषय पूर्ण होत असतानाच त्यांच्या मनात पुढच्या कामाची विचारचक्र सुरु व्हायची. ब्राह्मण सहाय्यक संघ कार्यरत झाल्यावर ओक गुरुजींनी समाजातील तरुण तरुणींसाठी विवाह मंडळ सुरु केले. आज लग्न जमविणे हा सुद्धा व्यवसाय बनला आहे. पण गुरुजी आपल्याकडे नोंद झालेल्या मुलामुलींच्या पत्रिका पाहून, माहिती घेवून स्वत: लग्न जुळविण्यासाठी अनेक घरांचे उंबरठे झिजवायचे. यामध्येही त्यांनी कधी पैसा पाहिला नाही. त्यांची पत्नी ओकबाई देखील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे काम करायचा. त्यांच्या कामातही ओक गुरुजींनी मदत केली. प्रोत्साहन दिले. ओक गुरुजी विश्र्व हिंदू परिषदेचे काम करीत असत. निवडणूकांच्या काळात गुहागरचे लोकनेते कै. डॉ. तात्या नातूंसोबत त्यांनी भारतीय जनता पार्टीचेही काम केले. मात्र या दोन्ही संस्थांमध्येही त्यांनी कधी पद मागितले नाही, घेतले नाही. अशा पध्दतीने निस्वार्थपणे, अविरत, प्रसिध्दी पराङमुख राहून समाजासाठी कार्य करत रहाणारे ओक गुरुजी आज निर्वतले.
देहदानाची इच्छा अपुरी
ओक गुरुजींनी मृत्युनंतर देहदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीरबाबीही पूर्ण केल्या होत्या. आयत्यावेळी नोंदणी केलेल्या रुग्णालयाला वेळेवर वाहन मिळाले नाही तर आपला देह रुग्णालयापर्यंत पोचावा म्हणून गुहागर पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय येथेही त्यांनी अर्ज केला होता. मात्र कोरोना संकटामुळे मृतदेह स्विकारता येणार नाही. असे रुग्णालयानेच सांगितले. त्यामुळे ओक गुरुजींची देहदानाची अंतिम इच्छा मात्र अपूर्ण राहीली आहे.