ईश्वर हलगरे, गुहागर- संपर्क. 9404161180
कवी राजेंद्र आरेकर यांचा ‘साद आईस’ हा दुसरा कवितासंग्रह सुनेत्रा प्रकाशन गुहागरच्या वतीनेप्रकाशित होत आहे ही अत्यंत आनांदाची बाब आहे. ‘आई’ या पहिल्या संग्रहाच्या माध्यमातून आरेकर यांची कविता कोकणच्या कलाप्रेमी भूमीत खऱ्या अर्थाने रुजली. तसेच विविध संमेलन आणि नियतकालिकांच्या माध्यमातून ती महाराष्ट्रातही पोहोचली. पहिला कवितासंग्रह ‘आई’ आणि दुसरा ‘साद आईस’ या शीर्षकावरून आपणास लक्षात येईलच की ‘आई’वर निरातिशय जीव असणाऱ्या या कवीचे संपूर्च भावविश्व ‘आई’ या दोन अक्षरी शब्दाने व्यापलेलं आहे. ‘आई’ संग्रहातील, SAD Aais poetry collection
“पंचप्राण तुझे गेले, घरी होता गां काळोख
जाता जाता तरी आई, होती मारायाची हाक…
परसातल्या वेलींना, बघ खुणावते जाई
पाना-फुलांतून पाही, माझी लाडकी गां आई…”
ही कविता गाताना व्यासपीठावर कितीतरी वेळा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळलेले प्रेक्षकांनी पाहिलेले आहेत.
कवी हा संवेदनशील असतोच आणि तो असायलाच हवा; कवी असण्याची ही पहिली पूर्चअट आहे. आपल्या भावनांना नैसर्गिकरित्या वाट करून देणे हीच तर कविता असते. आपल्या सभोवतालच्या बऱ्या-वाईट घटनांचे प्रतिबिंब म्हणजेतर कविता असते. कुठलीही कविता मोठी किंवा छोटी असत नाही; तर ती कविताच असते. आणि प्रत्येक कविला आपली कविता प्रियच असते. ‘साद आईस’ या संग्रहातील कविता या निसर्चकविता, भावकविता, प्रेमकविता, मुक्तछंद अशा कुठल्याही ढोबळ प्रकारात बद्ध न होता आपल्या अनुभवाचा अस्सलपणा घेऊन शब्दरूप होतात. SAD Aais poetry collection


गुहागरचे सांस्कृतिक वातावरण जिवंत ठेवण्यात आणि शब्दावर प्रेम करणाऱ्या इथल्या सर्वच मंडळीस एकत्र आणण्यास राजेंद्र आरेकर यांचा मोलाचा वाटा आहे. किंबहुना त्यांच्या पुढाकारानेच महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा स्थापन झाली. त्या माध्यमातून जिल्हास्तरीय व विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. ज्ञानरश्मी वाचनालयाची भव्य वास्तु त्यांच्याच इच्छाशक्तीच्या जोरावर उभी राहिलेली आहे. हे त्यांचे सांस्कृतिक कार्य कैक पिढयांना प्रेरणादायी असे आहे. त्यामुळे गुहागरची वाचन चळवळ जिवंत राहण्यास नक्कीच मदत होईल. SAD Aais poetry collection


येत्या 26 मार्च रोजी ज्ञानरश्मी वाचनालय गुहागर येथे ‘साद आईस’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिक आपली मते मांडतीलच. तूर्त संग्रहाचा इथे थोडक्यात धांडोळा घेणे आवश्यक वाटते. या संग्रहात एकूण 99 कविता आहेत. 100 वी कविता वाचकांनी आपल्या मनःपटलावर तयार करून एकूण कवितांचे शतक पूर्ण करावे, जणू यासाठीच कवीने कविताची संख्या 99 ठेवलेली असावी. मुखपृष्ठावरचा कवीचा सागराकडे निवांत आणि विचारमग्न पाहणारा फोटो एकूण जीवनाकडेही तटस्थ आणि निरामय पहावं हे सांगतो. तर आकाशातील इंद्रधनुष्याचे सात रंग जणू जीवनात येणाऱ्या विविधरंगी माणसांचेच प्रतीक आहेत असं वाटतं. SAD Aais poetry collection
मलपृष्ठावरील जेष्ठ कवी अरुण इंगवले यांची बोलकी पाठराखण एकूण कवितेचा आशय सांगणारी आहे. ‘राजेंद्र आरेकर यांची कविता हळवी, भाबडी कसलाही साज-शृंगार वा डौल न करणाऱ्या नऊवारीतल्या घरंदाज बाईसारखी आहे. डोईवरचा पदर घसरू न देता नाकातील नथ सांभाळीत वावरणारी तरीही चारचौघात उठून दिसणारी.’ कवयित्री प्रा. अंजली बर्वे यांची प्रस्तावना संग्रहातील कविता वाचकांस आकळण्यास साह्यभूत अशीच आहे. त्यांनी आरेकर यांच्या कवितेचे नेमके मर्म उलगडून दाखवलेले आहे. SAD Aais poetry collection
‘ना कधी थांबायचे’ या पहिल्या कवितेपासून ‘जखमी पाखरे’ या 99 व्या कवितेपर्यंतचा प्रवास कधी निर्जरासारखा संथ-अल्हादायक वाटतो; तर कधी ओबडधोबड कातळाप्रमाणे अस्वस्थ करतो. मानवी भावनांचा विविधांगी गोफ या कवितांतून विणलेला आहे. एकेक पदर सुटा करताना वाचक अंतर्मुख होऊन जातो. कधी अस्वस्थ होतो. आपल्याच कविता करण्याबद्दल कवी एके ठिकाणी म्हणतो, SAD Aais poetry collection
‘मधमाशीचा डंख होऊनी
विरह वेदना जेव्हा छळती
कवितेची मग वही उघडतो
कविता करतो भलती-सलती
वैफल्याच्या गर्दीमध्ये
कधी एकटा चिरडून जातो
शब्दांच्या विटेवर विटा
काव्याचे मग इमले रचतो’
शेतीमातीत मनस्वीपणे रामणारा हा कवी निसर्गाच्या लहरीपणावर आपल्या जोडीदारास म्हणतो,
‘नको घाबरूस राणी
सुखदु खाचा मी साथ
चल शेतामध्ये वेचू
भात नाचणीचे मोती’
प्रियकर-प्रेयसीचं नातं अर्थात भक्तीभावाचं असतं. त्याला कुठल्याही व्यावहारिक वा बिभत्स भावनांची किनार नसते. वेलीवर कळीने अलगत उमलावं तसा मनात प्रेमाचा अंकुर उमटत असतो. मग प्रियकर आपल्या प्रेयसीला विविध उपमांनी साद घालत असतो. SAD Aais poetry collection
‘टिपण्या अलगत बिंदू दवांचा
पर्ण फुलांची ओंजळ व्हावे
गुंफुनी हाती हात रवीचा
ऋतुगांधाचे गाणे गावे
ऐकून घेण्या नाद वेनुचा
कृष्णाची तू राधा व्हावे
माठ पेलूनी डोईवरला
यमुनेकाठी धुंद फिरावे’
लेखक -कवीबद्दल बोलताना एक विचारवंत म्हणतो की, साहित्यिक हा समाजाच्या भावभावनांची ठेव असलेला लॉकर असतो. तो समाजाचं सुखदु ख आपल्यात साठवून ठेवतो. त्याप्रमाणे कवी राजेंद्र आरेकर यांच्या अनेक रचनांमधून समाजाच्या विविध घटनाप्रसंगाचे ओरखडे उमटलेले जाणवतात. हा कवी समाजातील विद्रूप-हिस्र घटनांनी व्याकुळ होतो, निशब्द होतो. माणसेच माणसावर उलटताना पाहून हतबल होतो. आपण साऱ्यांसाठी खूप काही करत असताना लोक आपल्यावरच उलटतात हे पाहून हताश होतो. आणि अशाच मानसिकतेतून पुढीलप्रमाणे ओळी येतात, SAD Aais poetry collection
‘भारावल्या या नभाला काय सांगू
आसवे आली भरोनी काय सांगू?
जोडीत माणसांना गेलो क्षणाक्षणाला
दुरावल्या सहृदयांना काय सांगू?
वाहणाऱ्या निर्झराचे मन माझे
गढूळलेल्या डबक्यांना या काय सांगू?
यावरून कवीचा निरालसपणा आणि समाजाकडे पाहण्याची निकोप दृष्ट्टी दिसून येते. या संग्रहातील सर्वच कविता अतिशय वाचनीय आहेत. वाचकांच्या मनाची तार छेडणाऱ्या आहेत. वाचक या कवितांचे नक्कीच स्वागत करतील. ‘साद आईस’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनासाठी आणि एकूण वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! SAD Aais poetry collection