गुहागर नगरपंचायत, विषय समित्यांची बिनविरोध निवड
गुहागर, ता. 06 : येथील नगरपंचायतीमध्ये विषय समित्यांच्या सभापती पदासाठी आज निवडणूक झाली. सलग तिसऱ्यावर्षीही कोणताही बदल न करता पूर्वीच्याच सभापतींकडे सोपविण्यात आली. त्यामुळे ना नव्यांना संधी, ना जुन्याचे खाते बदल, विषय समित्यांची बिनविरोध निवड असेच या निवडणुकीबद्दल म्हणावे लागेल.
गुहागर नगरपंचायतीमध्ये 10 नगरसेवक शहर विकास आघाडीचे, 6 नगरसेवक भाजपचे आणि प्रत्येकी 1 नगरसेवक शिवसेना व राष्ट्रवादीचा असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेने आघाडीसोबत निवडणुकपूर्व युती केल्याने एकमात्र नगरसेविकाला सभापतीपद देण्यात आले. भाजपने शहर विकास आघाडी विरोधात निवडणूक लढवली. मात्र निकालांनतर भाजप सत्तेत सामिल झाला. त्यामुळे एक सभापती पद त्यांच्या खिशात पडले.
2018 मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर ज्यांना सभापतीपदे देण्यात आली त्यांनाच आज तिसऱ्यांदा संधी देण्यात आली. विरोधक नाही, अंतर्गत हेवेदावे नाहीत, नगराध्यक्षांचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे आजही निवडणूकही बिनविरोध पार पडली. जलनिस्सारण सभापती उपनगराध्यक्ष सौ. स्नेहा भागडे, बांधकाम सभापती माधव साटले, स्वच्छता व आरोग्य सभापती अमोल गोयथळे, महिला व बालकल्याण सभापती निलीमा गुरव, शिक्षण सभापती भाजप गटनेते उमेश भोसले असा निकाल प्रांताधिकारी प्रविण पवार यांनी जाहीर केला.
यावेळी सभापती पदाच्या निवडीत समित्यांचे वाटप बदलेल, सभापती बदलतील, सदस्य संख्येत अदलाबदल होईल. सदस्यांच्या समित्या बदलतील. अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. महिनाभरानंतर गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. त्यावेळच्या बदलांचे संकेत आज मिळतील अशी ही चर्चा होती. मात्र कोणताच बदल न झाल्याने आता उपनगराध्यही तोच रहाणार अशी चर्चा नगरसेवकांच्या वर्तुळात सुरु आहे.
—————————————————————————————————————————————-
सदस्यांमध्येही बदल नाहीच
प्रत्येक समितीमध्ये आघाडीचे ३ तर भाजपचे २ दोन सदस्य संख्या आहे. ती तशीच ठेवण्यात आले आहे. स्थायी समितीची रचना अध्यक्ष नगराध्यक्ष आणि आघाडीचे ३ सभापती, भाजपचा एक व शिवसेनेचा एक सभापती हे सदस्य अशी आहे. त्यामध्येही कोणताही बदल केलेला नाही.