राजेंद्र आरेकर की विजय मोहिते या विषयात अडकले तालुकाध्यक्ष पद
गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामचंद्र हुमणे यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून गुहागर तालुकाध्यक्षपद रिक्त आहे. पक्षाच्या वरिष्ठांनीही या विषयात लक्ष न घातल्याने व तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले राजेंद्र आरेकर व विजय मोहिते यापैकी कोण या वादात राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पद निवडीचे घोंगडे भिजत पडले आहे.
आमदार भास्करराव जाधव यांनी एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुहागर तालुक्यात राष्ट्रवादीचा झेंडा रोवला. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत सर्व जि. प. व पं. स. सदस्य, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हेही गेले. निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यात मोठा धक्का बसला. अशावेळी पक्षाने ज्येष्ठ कार्यकर्ते व जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र हुमणे यांच्याकडे तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. हुमणे यांनीही पक्षाच्या पडत्या काळात आणि विधानसभा निवडणुका होईपर्यंत चांगल्याप्रकारे तालुकाध्यक्ष पद सांभाळले. मात्र, आपल्या वाढत्या वयोमानामुळे पहिल्यासारखी धावपळ करणे शक्य नसल्याने त्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, मार्चपासून संपूर्ण देशात कोरोनाचे संकट सुरू झाले. यामुळे गुहागर तालुकाध्यक्ष पद निवडीचा विषय थांबला. विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सहकार्य केले व त्यांनी विश्वास दाखविला त्यांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व त्या वरिष्ठ पातळीवर सोडविण्यासाठी पाठपुरावा करणारे तालुकाध्यक्ष पदाचे नेतृत्व नसल्याने सर्वांची निराशा झाली. सध्या लहान सहान कार्यक्रम, विविध विषयांची निवेदन देण्याची कामे कार्यकर्त्यांना करावी लागत आहेत.
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पदासाठी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागरचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर व रोहिले गावातील पक्षाचे जुने कार्यकर्ते विजय मोहिते इच्छुक आहेत. शिवाय अन्य कार्यकर्तेहि इच्छुक होते. परंतु, तालुक्यातून या दोघांच्या नावालाही त्या – त्या गटातील कार्यकर्त्यांनी जोर लावलेला दिसत आहे. तालुकाध्यक्ष पदाचा हा विषय पक्षाचे खासदार सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या कानावरही घालण्यात आला आहे. मात्र, त्यांनीही तालुकाध्यक्ष पदाचा तेढा सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसत नाही. या वादामुळे उरली सुरली राष्ट्रवादी ही शिल्लक राहणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.