गुहागर : तालुक्यात मोठ्या प्रमाणात गवा रेडे आहेत. येथील शेतकऱ्यांच्या शेतीची नासधूस करणारे रानरेडे वेळणेश्वर फाटा येथे गुरुवारी सकाळी जखमी अवस्थेत सापडून आला. वेळणेश्वर वासीयांना लगेचच वन विभागाला संपर्क साधून कल्पना दिली, असता वनविभागाने घटनास्थळी येऊन गवा रेड्याला सुरक्षित स्थळी घेऊन गेले आहेत.
गुहागर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची लागवड करत असतात. मात्र, गेल्या काही वर्षात रानरेड्यांच्या वाढत्या नासधुसीमुळे नाचणी, भातशेती व फळबाग लागवडीची मोठी नुकसानी होत आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे. नुकसान भरपाई नाही, पण रानरेड्यांचा बंदोबस्त तरी करावा अशी शेतकऱ्यांची एकच अपेक्षा आहे. वाढत्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी जंगल परिसरात लागवड करणे सोडुन दिले आहे. लागवडीच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांनी तारेचे केलेले कुंपण देखील तोडून नासधूस केल्याच्या अनेक घटना आहेत.
दरम्यान, गुरुवारी रानरेड जखमी अवस्थेत वेळणेश्वर फाटा येथे गुरे घेऊन गेलेल्या ग्रामस्थांना दिसला. याचवेळी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकुर, माजी सरपंच नवनीत ठाकुर हे त्याठिकाणी आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, रानरेडा जखमी अवस्थेत असल्याने त्याला उठता येत नसल्याचे दिसून आले. ठाकुर यांनी लगेच गुहागर वन विभागाला कळविले. यावेळी महेंद्र पाडावे, संजोग तुपट, सुनील ईतापे, गणेश ठाकुर, प्रकाश देवळे, प्रतिक ठाकुर हेही उपस्थित होते.