भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. नीलम गोंधळी यांचा आरोप
गुहागर, ता. 08 : महिला सबलीकरणाची कागदी घोषणा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्रात याआधी तीन वेळा नव्या धोरणांचा गाजावाजा करूनही महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. महिलांना दुय्यम स्थान देण्याच्या मानसिकतेत बदल झालेला नाही. नव्या महिला धोरणाचे कागद फडकावून महिलांची फसवणूक करणाऱ्या सरकारला आता राज्यातील महिलांवरील अत्याचाराचा जाब द्यावा लागेल. असा इशारा भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. निलम गोंधळी यांनी आघाडी सरकारला दिला. Cheating on women


राज्याचे पहिले महिला धोरण १९९४ मध्ये जाहीर झाले. नोकरशाही, न्यायव्यवस्था, राजकारण, सत्ताकारण, प्रसार माध्यमे, शिक्षणसंस्था, खाजगी क्षेत्रे, उद्योगधंदे आणि कृषी क्षेत्रातही महिलांना दुय्यम स्थान देऊन महिलांचा आत्मविश्वास खच्ची करण्याचेच धोरण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने राबविले आहे. आता या कारस्थानात शिवसेनाही सामील झाली असून ठाकरे सरकारच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातील महिलांवर होणारे अत्याचार हा त्याचाच पुरावा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. गेल्या अडीच वर्षांत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. बलात्कार, विनयभंग, अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला, पण राज्य सरकार ढिम्म राहिले. Cheating on women
भाजपच्या दबावामुळे महिला आयोग स्थापन केल्यानंतरही या आयोगाकडून महिलांवरील अत्याचाराच्या कोणत्याही प्रकरणाची साधी दखलही घेतली जात नसल्याचा आरोपही श्रीमती उमा खापरे यांनी केला. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, मीरा रोड, कल्याण, पुणे, नंदुरबार, चंद्रपूर, येथे कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिला रुग्णांवरही अत्याचार झाला. पण यंत्रणेने यावर कोणतीही कारवाई केली नाही, उलट त्याकडे सोयीस्कर डोळेझाक करून आपण महिलाविरोधी असल्याचेच सिद्ध केले. Cheating on women
रोहा तालुक्यात गेल्या वर्षी एका १४ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. साकीनाका येथे एका अबला महिलेवर भीषण बलात्कार करून तिला ठार मारले गेले. हिंगणघाट येथे एका तरुण प्राध्यापिकेस भर रस्त्यात जाळून नराधमांनी तिचा जीव घेतला. Cheating on women
अशा घटनांमध्ये गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी, पीडितांची भेट घेऊन फोटो काढत प्रसिद्धी मिळविण्याचीच स्पर्धा चालते. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना आघाडी सरकारला मात्र सूडाच्या राजकारणाने पछाडले आहे, असा आरोपही त्यांनी केला. चोरी, मारहाण, बलात्कार, लैंगिक शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी किशोरवयीन मुलांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब सरकारनेच मान्य केली असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना फूस लावून अशा गुन्ह्यांमध्ये ढकलले जात असल्याचेही बोलले जात आहे. Cheating on women
आता नवे महिला धोरण आणण्याच्या वल्गना करणाऱ्या सरकारने अत्याचारग्रस्त महिलांना न्याय देण्यासाठी किती गुन्हेगारांवर कारवाई केली त्याचा जाब द्यावा. असे आव्हान सौ. निलम गोंधळी यांनी दिले. Cheating on women

