गुहागर : एप्रिल अखेरीस वेळणेश्र्वर मध्ये सुरु झालेल्या कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनाचा प्रश्र्न रोज नवी समस्या घेवून येतोत. जुलै महिन्यात येथील बायो मेडिकल कचऱ्याच्या प्रश्र्नाने समस्या निर्माण केली होती. आता कुजलेल्या अन्नपदार्थांच्या पिशव्या स्वॅब तपासणीच्या खोलीतच पडून आहे. त्यामुळे येणाऱ्या दुर्गंधीने तपासणीसाठी येणारे रुग्ण आणि तपासणी करणारे डॉक्टर, नर्स आदी कर्मचारी हैराण झालेत.
(अधिक माहितीसाठी गुहागर न्युजचा व्हिडिओ पहा)
पंधरा दिवसांपूर्वी वेळणेश्र्वरच्या कोविड केअर सेंटरमध्ये 74 रुग्ण होते. वास्ताविक ही संख्याच कोविड सेंटरच्या मर्यादे पलीकडची होती. त्यावेळी अनेक रुग्ण आपले डबे घरातून मागवत. मात्र त्यापैकी अनेकांनी येथील व्यवस्थापनाला आम्हाला डबे नको असे सांगितलेच नाही. त्यामुळे अन्न उरु लागले. कोविड केअर सेंटरसाठी केलेले अन्न अन्य कोणीही खायला नव्हे त्याला हात लावायलाही तयार नाही. परिणामी अन्न साठत गेले. आज कोविड केअर सेंटरमध्ये 14 रुग्ण आहेत. त्याच्यापैकीही काहीजण घरातून अन्न आणतात त्यामुळे अन्न शिल्लक रहाते.
या वस्तुस्थितीबरोबर आणखी एक गोष्ट पुढे आली ती म्हणजे डबा नको ही गोष्ट सांगायची कोणाला. वेळणेश्र्वरच्या कोविड केअर सेंटरला 1 वैद्यकिय अधिकारी, 1 फार्मासिस्ट आणि 1 किंवा 2 सहाय्यक नर्स एवढाच स्टाफ असतो. त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांची तपासणी करणे, त्याचा अहवाल पाठविणे, स्वॅब पाठविणे आदी कामे असतात. कोविड केअर सेंटरला व्यवस्थापन पहाणारा कोणीच नसल्याने या समस्या उद्भवत आहेत.
या संदर्भात वेळणेश्र्वर कोविड केअर सेंटरमधील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की, जुलै महिन्यात बायो मेडिकल वेस्टबद्दल समस्या निर्माण झाली होती. मात्र आता येथील सर्व बायो मेडिकल वेस्ट नियमितपणे उचलले जाते. परंतु गेल्या 15 दिवसांत येथील अन्नपदार्थाच्या पिशव्या उचललेल्या नाहीत. याबद्दल आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र अजुनही व्यवस्था झालेली नाही.