आमदार जाधव संतापले, रुग्णालयाला कोविड उपचारांना परवानगी कशी मिळाली ?
गुहागर : प्रकृती उत्तम असतानाही रवी बागकर यांचा मृत्यू का झाला. या प्रश्र्नांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार भास्करजाधव संतापले. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक फिजिशियन, टेक्निशियन तसेच वैद्यकीय यंत्रणा नसता या रुग्णालयाला कोविड सेंटरची परवानगी कशी मिळाली. असा प्रश्र्न त्यांनी खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधीला विचारला. ही बाब गांभिर्याने घेतली नाही तर कोणाचीही गय केली जाणार नाही. असा इशारा आमदार जाधव यांनी दिला. ते चिपळूणच्या तहसील कार्यालयात खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि तालुका प्रशासनाचे अधिकारी यांच्या एकत्रित बैठकीत बोलत होते.
चिपळूण तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते झाला. त्यावेळी शिवसेनेचे चिपळूण तालुका प्रमुख प्रताप शिंदे यांनी खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांकडून अवास्तव बिले वसुल करते. त्या विरोधात आंदोलन करुया. असा विषय आमदार जाधवांकडे मांडला. मात्र सध्या कोरोना रुग्णांना हॉस्पिटल उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांजवळ बोलून आपण मार्ग काढू या असे आमदार जाधव यांनी सांगितले. आम. भास्कर जाधवांनी तत्काळ प्रांतिधिकारी प्रविण पवार यांना खासगी रुग्णांलयाच्या डॉक्टरांसोबत बैठक आयोजित करण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे आज (ता. 25) चिपळूणच्या तहसील कार्यालयात खासगी रुग्णालयांचे डॉक्टर, चिपळूण तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी आणि प्रांत अशी बैठक पार पडली.
या बैठकीत आमदार भास्कर जाधव यांनी सुरवातीला खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांना अडचणी मांडण्यास सांगितले. त्यावेळी श्री हॉस्पिटलचे डॉ. अभिजित सावंत, पुजारी हॉस्पिटलचे डॉ. विशाल पुजारी यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी येणारा खर्च, कर्मचाऱ्यांची कमतरता आदी विषय मांडले. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी काही रुग्णांची नावे घेवून त्याच्या मृत्युची कारणे जाणून घेतली. यावेळी गुहागरमधील रवी बागकर यांची प्रकृती उत्तम असताना मृत्यु का झाला असेही त्यांनी विचारले. मात्र यावेळी लाईफ केअरचे व्यवस्थापन पहाणाऱ्या डॉ. परदेशींना योग्य उत्तर देता आले नाही. त्यानंतर अन्य दोन तीन प्रश्र्न आमदार जाधव यांनी विचारले. मात्र त्यांची ही समाधानकारक उत्तरे डॉ. परदेशी देवू शकले नाहीत. त्यामुळे आमदार भास्कर जाधव भडकले. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक फिजिशियन, टेक्निशियन तसेच वैदयकीय यंत्रणा नसताना सदर रुग्णालयाला परवानगी कशी मिळाली. कोविड सेंटर सुरु झाल्यानंतर तुम्ही स्थानिक अधिकाऱ्यांनीही तपासणी का केली नाही. असे संतप्त सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले. हे हॉस्पिटल रूग्णांच्या जीवाशी खेळत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. ती गांभीर्याने घ्या, अन्यथा आपण कोणाचीही गय करणार नाही. असा इशारा आमदार जाधव यांनी दिला. तसेच अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला रुग्णालयातील प्रमुख डॉक्टरांऐवजी व्यवस्थापन पहाणाऱ्या व्यक्तीला पाठविण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली.
या बैठकीला प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. वैभव विधाते, कामथे उपजिल्हा रूग्णालयाचे डॉ. अजय सानप, नायब तहसीलदार शेजाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे आदी उपस्थित होते.