लोटेतील कर्मचाऱ्यांसाठी चिपळूण आगारातून बसेस सुरू
गुहागर : लोटे औदयोगिक वसाहतीतील कर्मऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून भेडसावणारा प्रश्न आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्यामुळे सुटला आहे. त्यांनी केलेल्या सूचनेनंतर चिपळूण आगाराने चिपळूण-शेल्डी आणि चिपळूण-नोसिल या बसेस सुरू केल्या आहेत. कंपन्यांच्या तीन पाळयांनुसार या गाडयांच्या फेऱ्या धावणार आहेत.
लॉकडाऊन उठविण्यात आल्यानंतर राज्यात सर्वत्र उदयोगव्यवसाय, कारखाने सुरू झाले. अनलॉक 1 नंतर काही दिवसांनी प्रमुख मार्गांवर एस.टी.च्या गाडयाही सोडण्यास सरकारने परवानगी दिली. आता अनलॉक २ मध्ये राज्यातील सर्व वहातूक सुरळीत झाली आहे. परंतु अजुनही शाळा सुरु न झाल्याने एस.टी.चे भारमान कमी आहे. त्यामुळे तालुक्यांतर्गत मार्गावरील काही फेऱ्या अजुनही सुरु करण्यात आलेल्या नाही. याचा फटका लोटे औद्योगिक वसाहतीत कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसत होता. लोटे औदयोगिक वसाहतीतील कारखानेही सुरू झाले. परंतु चिपळूण किंवा शेल्डी, गुणदे व परिसरातील कर्मचारी व कामगारांना कंपनीत जाण्यासाठी एस.टी. नव्हती. या भागातील अनेक कर्मचाऱ्यांनी ही बाब गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तत्काळ चिपळूण आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांना कंपन्यांच्या पाळयांनुसार एस.टी. गाडया सुरू करण्याची सूचना केली. राजेशिर्के यांनीही आम. जाधवांच्या सूचनेची दखल घेवून लगेचच बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. चिपळूण आगाराने चिपळूण-शेल्डी आणि चिपळूण-नोसिल या बसेस सुरू केल्या आहेत. आगार व्यवस्थापकांनी आम. जाधव यांना पत्राद्वारे ही गोष्ट कळविली आहे. गाड्या सुरु झाल्यामुळे चिपळूण तसेच शेल्डी व परिसरातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी आमदार भास्कर जाधव यांचे आभार मानले आहेत.