- सरपंच पोटनिवडणूकीत श्रावणी पागडे सरपंच म्हणून विराजमान होणार
- श्रावणीसाठी सरपंच अर्पिता पवार व शंकर पागडे यांनी दिला राजीनामा
- गावाच्या सर्वागिण विकासासाठी गेली 20 वर्षे बिनविरोध निवडणूक
- तंटामुक्त समिती व वाडीप्रमुख यांचा पुढाकार
गुहागर : ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आबलोली गावाने कायम राखली आहे. 2014 च्या निवडणुकीत अर्पिता पवार जनतेतून निवडून आलेल्या सरपंच झाल्या. मात्र गावाला दिलेला सव्वा दोन वर्षाचा शब्द पाळत त्यांनी सरपंच पदाचा राजिनामा दिला. सरपंच पदासाठी त्याचवेळी श्रावणी पागडे यांचे नाव निश्चित झाले होते. म्हणून तेथून निवडून आलेल्या शंकर पागडे यांनी देखील ग्रामपंचायत सदस्याचा राजिनामा दिला आहे. आता श्रावणी पागडे पोटनिवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य बनतील. त्यानंतर त्यांच्या गळ्यात सरपंच पदाचीही माळ पडेल. या प्रक्रियेला संपूर्ण गावाचा एकमुखी पाठिंबा आहे.
आबलोली ग्रामपंचायत क्षेत्रात सुमारे तेराशे मतदार आहेत. येथील बाजारपेठ ही पंचक्रोशीतील गावांचे केंद्रबिंदू आहे. आजपर्यंत येथील सर्व पक्षीय नागरिकांनी गावाचा सर्वांगिण विकास डोळ्यासमोर ठेऊन ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात एकूण 13 वाड्या असून यातील प्रत्येक वाडीला ग्रामपंचायतीमध्ये नेतृत्व करण्याची संधी गावाने उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी तंटामुक्त समिती आणि वाडीप्रमुख यांचे अघोषित नियंत्रक मंडळ काम पहाते. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत गावातील प्रत्येक नागरिक आपआपल्या पक्षाचा काम करत असतो. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वजण पक्षाचे झेंडे बाजूला सारुन गाव विकासासाठी एकत्र येत असतात. ही आबलोली गावाची विशेषता समजली जाते.
2014 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच निवडून द्यायचा होता. आबलोली गावाने आपली बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम राखत प्रभाग क्र. ३ मधील अर्पिता उमेश पवार यांना सव्वा दोन वर्षांसाठी सरपंच म्हणून बिनविरोध निवडून दिले. 2014 मध्येच उर्वरित कालावधीसाठी प्रभाग क्र 1 खालची पागडेवाडी येथील उच्चशिक्षित श्रावणी पागडे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. सव्वा दोन वर्षांपूर्वी झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची वेळ आल्यावर अर्पिता पवार यांनी प्रामाणिकपणे राजिनामा दिला.
मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने सत्ता स्थापनेनंतर थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पध्दत बंद केली. त्यामुळे सध्या ग्रामपंचायत सदस्य असलेल्यांनाच सरपंच होण्याची संधी मिळणार आहे. परंतू श्रावणी पागडे या ग्रामपंचायत सदस्य नसल्याने आबलोली ग्रामपंचायतीत पेच निर्माण झाला. गावाने ठरवलेला निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा नव्हता. दरम्यान सरपंचांनी राजिनामा दिल्याने निवडणूक कार्यालयाने आबलोली ग्रामपंचायतीची सरपंच निवडीसाठी सभा बोलावली. त्यामुळे नेमके काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र गावाच्या निर्णयाबाहेर एकही ग्रामपंचायत सदस्य गेला नाही. निवडणूक विभागाने 2 सप्टेंबर रोजी सरपंच निवडीसाठी बोलावलेल्या सभेत सरपंच पदासाठी कोणीच अर्ज भरला नाही. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली.
गावाने ठरवलेला सरपंच (श्रावणी पागडे ) कायद्याच्या चौकटीत बसविण्याची प्रक्रिया (म्हणजे शासनाच्या नव्या बदलांप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य होण्याची प्रक्रिया) पार पाडणे आवश्यक होते. त्यावेळी प्रभाग क्र. १ खालची पागडेवाडीमधुन बिनविरोध निवडून आलेल्या शांताराम पागडे यांनी मनाचा मोठेपणा दाखविला. गावासाठी आपल्या ५ वर्षाच्या सदस्यत्वावर पाणी सोडले. श्रावणी पागडे ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला. पण त्यासाठी निवडणूक कार्यालयाने प्रभाग क्र. १ ची पोटनिवडणूक घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून लवकरात लवकर निवडणूक जाहीर करण्याची विनंती केली आहे. त्या प्रक्रियेनंतर श्रावणी पागडे ग्रामपंचायत सदस्य बनतील व त्यांचा सरपंच होण्याचा मार्गही मोकळा होईल.
गावाच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेऊन जे ठरले तेच घडवून आणण्याची हिमंत तंटामुक्त समिती, वाडीप्रमुख आणि आबलोलीवासीयांनी दाखवली. ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. हा आदर्श सर्वच गावकऱ्यांनी घेवून आपल्या निवडणूका बिनविरोध केल्या तर गावांचा विकास अधिक वेगाने होईल.
गुहागर न्युजच्या वतीने आबलोलीमधील तमाम ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन !
हे ठरले नायक
अर्पिता पवार यांनी राजिनामा दिला नसता तर त्यांना कायदेशीरदृष्ट्या सरपंच पदावरुन कोणी बाजुला करु शकले नसते. (अपवाद न्यायालयीन लढाईचा) शासनाने सरपंच निवडीची पध्दत बदलल्याने शांताराम पागडे यांना ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजिनामा द्यावा लागला. अन्यथा श्रावणी पागडे यांचा मार्ग मोकळा झाला नसता. त्यामुळे परंपरा कायम ठेवण्यासाठी पदाचा त्याग करणारे हे खरे नायक ठरले आहेत.