भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गुहागर : कोरोना महामारी रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामधील विविध यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदी यामधील अनियमिततेची सचिव पातळीवर चौकशी करुन संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात यावी. अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे पत्राव्दारे केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड – 19 अंतर्गत मार्च 2020 पासून विविध यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदी केली गेली. या खरेदी प्रक्रियेकरिता आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता, खर्चाकरिताच्या मान्यतेचे कागदपत्रे व शासनाचे दरपत्रक, प्रत्यक्ष बाजारातील किंमत यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत लक्षात येते. तसेच यंत्रसामुग्री व उपकरणे यांची खरेदी करत असताना त्यांच्या योग्य त्या दर्जाबाबत व खरेदी प्रक्रियेबाबत अनेक विषयांमध्ये अनियमितता दिसून येत आहे. या सर्व विषयांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. शासनाकडून उपलब्ध झालेला निधी नक्की कोणत्या कामाकरिता वापरला गेला आहे. याची माहिती मिळणे गरजेचे आहे. तसेच यंत्रसामुग्रीची खरेदी प्रक्रिया पारदर्शक नसल्याने प्रत्यक्ष रुग्णांकरिता आलेला निधी अन्य ठिकाणी वापरला जात असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष असल्याचे डॉ. नातू यांनी या पत्रात म्हटले आहे.