गुहागर : तालुक्यातील कुडली येथील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा प्रतिष्ठान माटलवाडी यांच्यातर्फे जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं. 3 शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
युवा प्रतिष्ठानतर्फे नेहमीच शाळेला मदतीचा हातभार लावला जातो. कोरोना महामारीच्या काळात गावी आलेले प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबन माटल, उपाध्यक्ष सचिन थोरसे, सेक्रेटरी मोहन माटल, विजय माटल, विजय ठोंबरे, वसंत माटल, संदिप थोरसे, सागर वणे, संदेश माटल, अविनाश माटल यांच्यासह काही पदाधिकार्यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी मदत करण्याची इच्छा मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांच्याकडे व्यक्त केली. त्याप्रमाणे वर्षभर पुरतील एवढ्या वह्या प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मदत केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा निकिता ठोंबरे, उपाध्यक्ष राजेश वणे, उपसरपंच पांडुरंग थोरसे, शिवराम थोरसे, गंगाराम माटल, मधुकर माटल यांनी प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांना धन्यवाद दिले.