७२७ पोलीस अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर बदली
मुंबई : गेले काही दिवस मुंबई पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा गेल्याचं पहायला मिळत आहे. अँटिलियाबाहेर सापडलेली स्फोटकं, आणि त्यात सचिन वाझेंसह इतरही काही पोलीस अधिकाऱ्यांचा हात, मनसुख हिरेन हत्या प्रकरण, परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब ते नुकतीच एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना झालेली अटक यामुळे मुंबई पोलीसांच्या कार्यक्षमतेबद्दल संशयाचं वातवरण निर्माण झालेलं असताना आता राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात ८ वर्षांहून अधिक काळ सेवा देणारे पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या मुंबईच्या बाहेर बदल्या करण्यात येणार आहेत. यासाठीची यादी देखील तयार करण्यात आली आहे.
पोलीस दलातील नियमाप्रमाणे एका जिल्ह्यामध्ये सलग आठ वर्षे सेवा दिल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात बदली केली जाते. याच नियमानुसार मुंबई पोलीस दलातील ७२७ अधिकाऱ्यांची इतर जिल्ह्यांमध्ये बदली केली जाणार आहे. यामध्ये ८९ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २५३ निरीक्षक, ३७५ सहाय्यक निरीक्षक आणि १० उपनिरीक्षकांचा समावेश असल्याचं कळतंय. या अधिकाऱ्यांना त्यांच्या आवडीच्या ३ जिल्ह्यांची बदलीसाठी निवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या तीनपैकी एक जिल्हा त्यांचा मूळ जिल्हा ठेवण्याची मुभा देखील देण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
दरम्यान, परमबीर सिंह यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटविण्यात आल्यानंतर सर्वप्रथम गुन्हे शाखेला वाझे प्रकरणाचा फटका बसला. सुरुवातीला ६५ अधिकाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी आणखी अधिकाऱ्यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात आली.