अडूरमधील घटना, नाशिकहून आले होते मूळ गावी
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील अडूर येथे श्री देव त्रिविक्रम नारायण मंदिरालगतच्या विहिरीमध्ये उडी घेऊन 56 वर्षीय प्रौढाने आत्महत्या केली आहे. संजय दत्तात्रय केळकर असे त्यांचे नाव असून ते नाशिकला रहातात. ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार असलेल्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी शुक्रवारी सकाळी ते अडूरमध्ये आले होते.
संजय केळकर यांचे मोठे बंधु राजेंद्र केळकर (रा. चिपळूण) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केळकरांचे मुळ गाव अडूर. संजय केळकर हे नाशिकला (Nashik) रहातात. तेथे ते आयुर्विमा प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. 15 वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अधुनमधुन त्यांचे मानसिक संतुलन बिघडत असे. शुक्रवारी सकाळी नाशिकवरुन संजय केळकर हे आपल्या मूळ गावी अडूर येथे आले होते. त्यांचा अडूर गावातील एक मित्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवार आहे. संजय केळकर यांनी त्याची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्री देव त्रिविक्रम नारायण मंदिरात ते दर्शनाला गेले. त्यानंतर मंदिरालगत असलेल्या विहीरीत उडी टाकून त्यांनी आत्महत्या केली. (Suicide in Adur)
सदर घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी गावातील मित्राला आणि अन्य ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी संजय केळकर यांचे मोठे बंधु राजेंद्र केळकर यांना चिपळुणहून बोलावून घेतले. पोलीसांनी संजय केळकर यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार गणेश कादवडकर करीत आहेत.