पोलीस निरीक्षक बोडके, 43 व्यक्तींनी केले रक्तदान
गुहागर : रक्तदानासारखे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून गुहागर तालुका पत्रकार संघाने समाजाचे उद्बोधन करणाऱ्या आचार्य जांभेकरांची जयंती साजरी केली. ही कौतुकाची बाब आहे. असे मत गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी व्यक्त केले. ते गुहागर तालुका पत्रकार संघाच्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
मराठी वृत्तपत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन साजरा केला जातो. या दिवशी गुहागर तालुका पत्रकार संघाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शहरातील भंडारी भवनमध्ये झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी केले. यावेळी बोलताना बोडके म्हणाले की, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करताना समाज जागृतीला प्राधान्य दिले. आज त्याच्या जयंतीच्या दिवशी रक्तदानासारखे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी गुहागरमधील पत्रकार एकत्र आलेत हे अभिनंदनीय आहे.
या शिबिरामध्ये 43 जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये अनिल वनवारी, गुहागर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कविता बोरकर, 17 वेळा रक्तदान करणारे नामदेव झगडे, प्रथमच रक्तदान करणारा सोहम् वैद्य, जिल्हा परिषद इमारती बांधकाम उपविभाग गुहागरचे प्रभारी उपअभियंता वैभव चौधरी, गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक संदीप भोसले, साई कळझुणकर, यांच्यासह महसूल, पंचायत समिती, कृषी विभाग आदी शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, शहरातील खेळाडू, तालुक्यातील ग्रामस्थ यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिरामध्ये रक्तसंकलनाचे काम डेरवण येथील भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालय संचलित श्री स्वामी समर्थ रक्तपेढीच्या टीमने केले. तर रक्तदान शिबिरासाठी रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल्स् प्रा. लि. या कंपनीसह विवेकानंद रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेने आर्थिक साह्य केले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मयूरेश पाटणकर, उपाध्यक्ष मंदार गोयथळे, सचिव निलेश गोयथळे, खजिनदार आशिष कारेकर, संचालक मनोज बावधनकर, गणेश धनावडे, सत्यवान घाडे, अमोल पवार, संतोष कदम, संकेत गोयथळे, आदित्य घुमे, संतोष घुमे, सचिन ओक, नीलेश सुर्वे, नमिता साटले, मिनल जोशी, सायली घुमे या सर्वांनी मेहनत घेतली.
रक्तदानपूर्व चाचणी करताना मुख्याधिकारी कविता बोरकर
सामाजिक बांधिलकी जपणारे पत्रकार – राजेश बेंडल
गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल शुभेच्छा देताना म्हणाले की, गुहागर तालुका पत्रकार संघातील सर्व पत्रकार तरुण, उत्साही आहेत. नगरपंचायतीच्या सर्व उपक्रमांमध्ये ते सहभागी होतात. विविध उपक्रम यशस्वी करणाऱ्या पत्रकार संघाने नेहमीच सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. कोरोना संकटानंतर आज देशात रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशावेळी सामाजिक दायित्व स्वीकारून रक्तदान शिबिरासारखा कार्यक्रम गुहागर तालुका पत्रकार संघाने आयोजित केला. ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे.
रक्तदान शिबिराचे मान्यवरांनी केले कौतुक
गुहागरचे गटविकास अधिकारी अमोल भोसले, प्रकल्प अधिकारी प्रकाश भोसले, उपअभियंता चौधरी, नगरपंचायतीमधील सभापती अमोल गोयथळे, नगरपंचायत गटनेते आणि सभापती उमेश भोसले, नगरसेवक समीर घाणेकर, नगरसेवक व भाजप शहराध्यक्ष प्रकाश रहाटे, गृहरक्षक दलाचे समन्वयक सुधाकर कांबळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, भाजयुमोचे तालुका प्रमुख संजय मालप, शहर प्रमुख मंदार पालशेतकर, गुहागर हायस्कूलचे शिक्षक गंगावणे, सौ. ज्योती परचुरे, पंचायत समिती, महसुल, पोलीस खात्यामधील अधिकारी आदी मान्यवरांनी शिबिरस्थानी येऊन पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबिर घेतल्याबद्दल कौतुक केले.