गुहागर, ता. 27 : आजपर्यंत समुद्रकिनाऱ्यावर रात्री दिसणाऱ्या निळ्या लाटांची चर्चा सुरु होती. मात्र गेले दोन दिवस गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सकाळच्या वेळेत पिवळसर लाटही दिसत आहे. निळ्या लाटांपेक्षाही दिवसा दिसणाऱ्या या पिवळ्या लाटेचे प्रमाण खूपच कमी आहे. आता या लाटेबद्दलही कुतुहल निर्माण झाले आहे.
डिसेंबर महिन्यात रात्री भरतीच्या वेळी फ्लुरोसंट निळ्या लाटा गुहागरच्या समुद्रावर दिसत आहे. पर्यटकांसह तालुक्यातील अनेक ग्रामस्थांनी या लाटांचा अनुभव घेतला. समुद्रावर अंधाऱ्या परिसरात उभे राहीले तर चमकणाऱ्या लाटा आजही पहाता येतात. या लाटा सुक्ष्म प्लवंगांचे पाण्याबरोबर घर्षण झाल्यानंतर प्लवंगांमधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशामुळे ती लाट निळसर दिसते.
गेले दोन तीन दिवस सकाळी उजाडल्यावर समुद्रकिनाऱ्यावर सुर्यकिरणे येण्याआधी देखील समुद्राच्या लाटा चमकताना दिसत आहे. मात्र दिवसा चमकणाऱ्या लाटांचा रंग फ्लुरोसंट पिवळा दिसतो. रात्री दिसणाऱ्या लाटांच्या संख्येपेक्षा पिवळ्या लाटांचे प्रमाण कमी आहे. तासाभरात एखादी लाट चमकताना दिसते. सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या काही लोकांनी ही पिवळी लाट पाहीली. त्यावेळी हा प्लवंग असेल असे लक्षात आले नाही. समुद्रातील ऑइलमुळे पाण्याचा रंग बदलला असेल असे वाटले. परंतू दोन दिवस समुद्राचे निरिक्षण केले असता एखादी लाट क्षणार्धात पिवळी होत असल्याचे लक्षात आले.
याबाबत समुद्रमधील जीवशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या प्राध्यापिका स्वप्नजा मोहिते म्हणाल्या की, पिवळी लाट देखील या प्लवंगामुळेच तयार होत आहे. आम्ही मांडवीतील समुद्रकिनाऱ्यावरुन काही प्लवंगांचे नमुने असलेले पाणी तपासण्यासाठी आणले. ते पाणी हलवल्यावर देखील भांड्याच्या कडेला हिरवट पिवळा थर दिसत होता. प्रखर सुर्यप्रकाशात प्लवंगाचा उजेड दिसू शकत नाही. त्यामुळे सकाळच्या वेळत काही वेळा कोट्यावधी प्लवंगांचा थर एकत्र जमा झाला असेल तर पाण्यासोबत होणाऱ्या घर्षणामुळे लाट हिरवट पिवळी दिसू शकते.
प्राध्यापिका स्वप्नजा मोहिते यांनी पाठवलेले छायाचित्र
या छायाचित्रात पाण्यात जे जेलीसारखे कण दिसत आहेत त्यांनाच प्लवंग असे म्हणतात. असा कोट्यावधी प्लवंगांच्या समुहाचे घर्षण होते (लाट येते त्यावेळी तसेच प्लवंग असलेल्य पाण्यात काठी मारल्यावर, जोराने पाय आपटल्यावर) त्यावेळी हा प्लवंगांचा समुह प्रकाशित होतो. रात्रीच्या वेळी तो निळसर दिसतो तर सकाळच्या वेळी तोच प्लवंग छायाचित्राप्रमाणे पिवळसर लाटेत आपले अस्तित्त्व दाखवतो.
निळ्या लाटांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.