गुहागरमध्ये पर्यटकांची गर्दी, व्यावसायिक सुखावले
गुहागर, ता. 18 : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे थांबलेले पर्यटन दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा सुरु झाले. गेले 8 महिने तणाव सहन केल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्र्वास घेण्यासाठी आणि रोजच्या जीवनशैलीत बदल म्हणून मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी शहरांमधील लोकांनी गुहागरककडे धाव घेतली आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यासह तालुक्यातील पर्यटनस्थळे हाऊसफुल असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासूनच खरतरं पर्यटनाला सुरवात झाली होती. परंतु त्यावेळी तुरळक पर्यटक होते. गुहागरला आल्यावर रहायला हॉटेल मिळेल का, जेवणाखाणाची व्यवस्था होईल का असे अनेक प्रश्र्न पर्यटकांच्या मनात होते. पण दिवाळी जवळ येऊ लागली तसे हॉटेल व्यावसायिकांकडे येणाऱ्या चौकशीच्या फोनचे प्रमाण वाढले. तेव्हाच दिवाळीत पर्यटन व्यवसाय बहेरल असा अंदाज होता. त्यातच दिवाळीच्या पहिल्या दिवशी राज्यसरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय केला. त्यामुळे निसर्ग पर्यटनाला धार्मिक पर्यटनाचीही जोड मिळाली आहे.
अनेक पर्यटन व्यावसायिकांनी कर्ज काढुन व्यवसाय उभे केलेत. पर्यटन व्यवसायामुळे भाकऱ्या भाजून देणे, चपात्या करुन देणे, हॉटेल लॉजमध्ये नोकरी, ऑडर्रप्रमाणे पर्यटकांना जेवण बनवून देणे, उशा गाद्या आदी साहित्य पुरविणे असे अनेक उद्योग गुहागर तालुक्यात सुरु झाले होते. कोरोना संकटामुळे हे सर्व उद्योग ठप्प झाले. रोजगार बुडाला. पण आता भाऊबीजेनंतर तालुक्यातील गुहागर समुद्रकिनारा, वेळणेश्वर, हेदवी समुद्र किनारी पर्यटकांनी गर्दी केलेली पहावयास मिळत आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून थंडावलेल्या पर्यटन व्यवसायाला चांगली चालना मिळाली आहे. त्यामुळे तालुक्यातील पर्यटन व्यावसायिक सुखावले आहेत.