नीलेश सुर्वे, महावितरणसमोर भाजपने केली वीजबिलांची होळी
गुहागर, ता. 23 : गेल्या सहा महिन्यात गुहागर तालुक्यात वीज गेली नाही असा एक दिवस नाही. दिवाळीच्या सणही सुखात गेला नाही. खंडीत वीजपुरवठा असूनही वारेमाप बिले दिली जातात. ग्रामीण भागातील उपकेंद्रात जनतेला उत्तरे द्यायला अधिकारी नसतो. गुहागर, शृंगारतळीसारख्या शहरी भागातही विजेच्या समस्या आहेत. यात सुधारणा व्हावी म्हणून आजपर्यंत अनेकवेळा भेटी घेतल्या निवेदने दिली. मात्र तुम्ही ऐकत नाही. सरकारही जनतेच्या समस्येकडे लक्ष देत नाही. म्हणून आज भाजप रस्त्यावर उतरायला. वीज बिल होळीच्या धुराचे अंजन तुमच्या सर्वांच्या डोळ्यात जावे आणि डोळे उघडावेत म्हणून आज आंदोलन करत आहोत. मात्र यापुढे बिले भरली नाहीत म्हणून वीज तोडली तर संघर्ष होईल. असा इशारा आज भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी महावितरणच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.
गुहागर शहरातील महावितरण कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी वीज बिलांची होळी केली. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांजवळ बोलताना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे म्हणाले की, वीजपुरवठा खंडीत होतो हे समजू शकते. पण वीज परत येते तेव्हा होल्टेज इतके वाढते की, टी.व्ही., फ्रिज, एसी. आदी उपकरणे जळतात. याला जबाबदार कोण. 2017 पासून दिलेला प्रस्तावावर अजून निर्णय झालेला नाही. जिल्हा सोशल मिडिया प्रमुख शार्दूल भावे म्हणाले की, बावनकुळे ऊर्जामंत्री असताना बाजारपेठेसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर मंजूर करून आणला. मात्र आजपर्यंत महावितरणने बाजारपेठेत जागेचा सर्व्हे केलेला नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण शिगवण म्हणाले की किमान सामान्य जनतेला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा असते. मात्र महावितरणचे अधिकारी जनतेलाच वेडे बनवतात. पंचायत समिती सदस्या सौ. स्मिता धामणस्कर म्हणाल्या की रानवी उपकेंद्रातील अधिकारी ज्याला विजेच्या खांबावर चढायचे अधिकार नाहीत त्यांनाच पोलवर चढायला लावतात. दुसर्या कर्मचार्याची नेमणुकीबद्दल, रानवीमधील विजेच्या लपंडावाबद्दल प्रत्येक मासिक सभेत प्रश्न विचारले जातात. त्याला तुमच्याकडून उत्तरे दिली जात नाहीत. हा कारभार योग्य आहे का. गणेश भिडे म्हणाले निसर्ग वादळात तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामस्थांनी तुम्हाला मदत केली. तरीही तुमची जनतेपोटी उदासीन भूमिका का. अशा पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यासमोर अनेक समस्यांचा पाढा वाचला. प्रश्नांचा भडिमार केला. मात्र त्यावर अधिकाऱ्यांनी चकार शब्द न काढता केवळ ऐकण्याची भूमिका निभावली. त्यामुळे अखेर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी हे शेवटचे आंदोलन सुधारणा झाली नाही तर आता संघर्ष होईल असा इशाराच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिला.
या आंदोलनामध्ये जिल्हा सरचिटणीस सुरेश सावंत, महिला मोर्च्याच्या सौ. रश्मी पालशेतकर, किसान मोर्चाचे संदीप गोरिवले, पंचायत समिती सदस्या सौ. स्मिता धामणस्कर, नगरसेवक उमेश भोसले, सौ. भाग्यलक्ष्मी कानडे, मृणाल गोयथळे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, ज्येष्ठ नेते लक्ष्मण शिगवण, माजी सभापती सौ. दीप्ती असगोलकर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष संजय मालप, मच्छीमार नेते श्रीधर नाटेकर, गुहागर शहराध्यक्ष प्रकाश रहाटे, भाजयुमोचे शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, सौ. वैशाली मावळंकर, श्रद्धा घाडे, शाल्मली वराडकर, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.