सचिन कारेकर यांचे हळद उत्पादकांना आवाहन
गुहागर, ता.25 : हळद लागवडी दरम्यान जशी मेहनत आपण घेतो त्याच पद्धतीने हा आपला व्यवसाय आहे, असे समजून हळदीच्या मार्केटिंग बाबत आपण स्वत: प्रयत्न करायला हवे,असे आवाहन स्पेशल कोकण-४ (SK-4) या हळदीच्या वाणाचे संशोधक प्रगतीशील शेतकरी सचिन कारेकर यांनी केले.
वरवेली येथील शेतकरी क्षितिज शिंदे यांनी लागवड केलेल्या हळदीच्या प्लाॅटला शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. यावेळी हळद काढणी पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी कृषी अधिकारी आर.के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्रामसेवक महेंद्र भुवड, यांच्यासह पूनम रावणंग, धनश्री चांदोरकर, मुनवर घारे,कृष्णा चव्हाण, संदिप पवार, वैभव पवार, प्रल्हाद विचारे, शेखर विचारे, दिव्या किरवे, गणेश रांजाणे, गणेश किरवे, मनोहर साळवी, मिलिंद मोहिते, शशिकांत जाधव, वासंती आंबेकर, संदिप विचारे, दिपक विचारे, श्वेता शिंदे, इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
हळद हे एक पर्यायी पिक म्हणून त्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे १० गुंठया पेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड करू नये, मर्यादित क्षेत्रावरच यांची लागवड करावी,अशी सूचनाही सचिन कारेकर यांनी केली. इतर पिकांची लागवड करण्याचे आवाहन करून दिवसेंदिवस शेतीचे क्षेत्र कमी होत असल्याबद्दल कारेकर यांनी चिंता व्यक्त केली.
गजेंद्र पौनीकर यांनी क्षितिज शिंदे यांनी सुरूवातीपासून सेंद्रिय खते, रासायनिक खतांचा वापर, औषधे व पाण्यात विरघळणा-या खतांची योग्य पद्धतीने फवारणी केली असल्याने या प्लाॅटची योग्य पद्धतीने वाढ झाल्याचे सांगितले. कृषी अधिकारी आर.के. धायगुडे यांनी सर्व उपस्थित शेतकरी व मान्यवराचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. गामसेवक महेंद्र भुवड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
