गुहागर, ता. २९ : तालुक्यातील अल्पवयीन गर्भवती विवाहितेच्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्हात 36 वर्षीय तरुणाला बालकांवरील लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोक्सो) गुहागर पोलीसांनी सोमवारी (ता. 28) अटक केली. दरम्यान शनिवारी (ता. 26 डिसेंबर) अटक केलेल्या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. तर सोमवारी अटक केलेल्या आरोपीला बुधवार (ता. 30) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तालुक्यातील मासु गावातील अल्पवयीन मुलीचा (वय 16) विवाह मार्गताम्हाने येथील रोशन श्रीकृष्ण किलजे याच्याशी झाला होता. विवाहानंतर 15 दिवसांनी अल्पवयीन विवाहितेच्या पोटात दुखू लागले. त्यावेळी तपासणी केली असता ती 5 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. या घटनेत सदर मुलीला बालसुधार गृहात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर रत्नागिरी पोलीसांनी हा गुन्हा गुहागर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. चिपळूणच्या पोलीस उपनिरीक्षक सोनाली झेंडे यांनी सदर मुलीची चौकशी करुन गुन्ह्याचा तपास सुरु केला. शनिवारी (ता. 26 डिसेंबर) सदर मुलीचा पती रोशन श्रीकृष्ण किलजे, वय 25 राहणार मालघर, तालुका चिपळूण याला, तसेच 2018 पासून प्रेमसंबध असलेल्या अमेय संतोष कारेकर, वय 22, राहणार आबलोली याला पोलीसांनी बालकांवरील लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोक्सो)अटक केली. दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवलेल्या या दोन आरोपींची रवानगी आज (ता. २९) न्यायालयीन कोठडीत झाली आहे.
या मुलीने दिलेल्या माहिती वरुन सोमवारी (ता. 28 डिसेंबर) अरूण बुद्धदास पवार, वय 36, राहणार आबलोली यालाही पोलीसांनी अटक केली आहे. सदर आरोपी अल्पवयीन मुलीचा प्रियकर होता असे मुलगी सांगत आहे. मात्र वयाच्या अंतराचा विचार करुन यामागे आणखी काही कारणे आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.