नवी दिल्ली : आज सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील नागरिकांना संबोधित केलं. “संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे. कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील देशात आणि भारतात मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित झालेला नसला तरी योग दिनानिमित्त उत्साह कमी झालेला नाही,” असं मोदी म्हणाले.
देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जगातील बहुतांश देशांसाठी योग दिन हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही. पण या कठीण समयी, एवढ्या अडचणीत लोक योग विसरु शकत होते. परंतु त्याउलट योगासनांनी लोकांचा उत्साह वाढवला आहे, योगासनांमुळे प्रेम वाढलं आहे.”
कोरोना महामारीचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, “जेव्हा कोरोनाच्या अदृश्य विषाणूने जगभरात पाय पसरले त्यावेळी कोणताही देश साधनं, सामर्थ आणि मानसिकदृष्ट्या यासाठी तयार नव्हात. परंतु आपण सगळ्यांनी पाहिलं की, अशा कठीण प्रसंगी योगासनं आत्मविश्वास वाढवण्याचं मोठं माध्यम बनलं.
भारताने जेव्हा आरोग्याचा उल्लेख केला तेव्हा तो केवळ शारीरिक स्वास्थ्याशी निगडीत नव्हता. योगासनांमध्ये शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावरही भर देण्यात आला आहे. योगासनांमुळे तणावापासून मजबुतीपर्यंत आणि निगेटिव्हिटीपासून क्रिएटिव्हिटीचा मार्ग दाखवतो, असं मोदी म्हणाले.
भारताने यूएनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला, त्यावेळी योगासनाचं महत्त्व संपूर्ण जगभरात समजावं ही एकमेव भावना होती. आज या दिशेने भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता जगाला M-Yoga अॅपची शक्ती मिळणार आहे. या अॅपमध्ये कॉमन योग प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षणाचे अनेक व्हिडीओ जगातील विविध भाषांमध्ये उपलब्ध असतील.