महामार्ग अधिकारी व प्रांताधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांची मागणी
गुहागर : गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे शृंगारतळी बाजार पेठेतून काम सुरू करताना प्रथम याठिकाणी मार्किंग करा आणि त्यानंतरच कामाला सुरुवात करा, अशी मागणी पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी महामार्ग अधिकारी व प्रांताधिकाऱ्यांकडे केली.
गुहागर – विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मार्गताम्हाणे ते चिखली पर्यंत बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. परंतु, तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत महामार्गासाठी नक्की किती क्षेत्र जाणार याची माहिती रस्त्याशेजारी व्यापारी व जमीन मालकांना नव्हती. याबाबत सर्वांमध्ये संभ्रमावस्था असल्याने पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, राष्ट्रीय महामार्ग शाखा अभियंता आर. आर. मराठे, पाटपन्हाळे सरपंच संजय पवार, सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता माधव नित्सुरे, ग्रामपंचायत सदस्य रियाज ठाकूर, अमरनाथ मोहिते, यांच्यासह बाजारपेठेतील व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी व्यापाऱ्यांनी शृंगारतळी बाजारपेठेतील रस्ता हा अडीच रुंद आहे. परंतु कामाला सुरुवात करताना प्रथम मार्किंग करा, म्हणजे यामध्ये कोणाची किती जागा जाते ते स्पष्ट होईल असे सांगितले. तसेच मार्किंग व मोजणी करताना ग्रामस्थांना विश्वासात घेऊन रितसर नोटीस पाठवाव्यात. बाजारपेठेत १०० मीटरवर रस्त्यावरून पाईपलाईन टाकण्यात यावी. आज जागा मालक एक व दुकानदार वेगळा असून यामध्ये मोबदला कशाप्रकारे मिळणार हाही प्रश्न विचारण्यात आला. बाजारपेठमध्ये काम सुरू करण्यापूर्वी मार्गताम्हाणे ते चिखली पर्यंतच्या अर्धवट रस्त्याचे काम प्रथम पूर्ण करा. त्यानंतरच शृंगारतळी ते मोडकाघर पूल पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर शृंगारतळी बाजारपेठेतील काम सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या महामार्गासाठी ज्यांची जमीन जाणार आहे, या जमीन मालकांना योग्य तो मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
संयुक्त मोजणीच्या नोटिसाच नाहीत
गुहागर बाजारपेठ ते मोडकाआगर पर्यंत काही दिवसांपूर्वी महामार्ग व भूमी अभिलेख विभागाने संयुक्त मोजणी केली. या संयुक्त मोजणीसाठी २८० जमीन मालकांना नोटिसा पाठविणे आवश्यक होते. परंतु येथील केवळ पंचवीस जमीन मालकांना नोटिसा पाठविण्यात आल्या. यामुळे अनेक जागा मालकांना आपली जागा किती व कशी जाते याची कल्पनाच नाही. याबाबत जागा मालकांनी वेळीच जाब न विचारल्यास महामार्गाच्या मोबदल्यापासून वंचित रहावे, लागण्याची भीती व्यक्त होत आहे.