रत्नागिरी जिल्ह्यातील दोन आमदार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या मतदारसंघात यावे म्हणून मागणी करत आहेत. मात्र गुहागरमध्ये निरामय रुग्णालयाची अद्ययावत इमारत पडून असल्याचे तेथे वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास शासनाला जमीनीसाठी, इमारतीसाठी खर्च करावा लागणार नाही. असे पत्र गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. कोरोनाच्या संकटात कोकणात वैद्यकिय सुविधांची कमतरता चांगलीच जाणवली. विशेषत: गुहागरसारख्या तालुक्यात एकही रुग्णालय नसल्याने अनेक रुग्णांचे हाल झाले. मोडकाआगर पुल बंद असल्याने अनेक रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत चिपळूणला जाण्यासाठी २२ कि.मी.चा वळसा घालावा लागत होता. त्यामुळेच शिवतेज फाऊंडेशनसारख्या संस्थांनी कोविड केअर सेंटरसाठी दाभोळ वीज चॅरिटेबल ट्रस्टच्या ताब्यात असलेले निरामय हॉस्पिटल शासनाने ताब्यात घ्यावे म्हणून मोहिम उभी केली. परंतू जनतेच्या हिताचे निर्णय कायमच विलंबाने करावेत असा शासनाचा अलिखित नियम आहे. त्यामुळे कुलपबंद इमारतीचे ऑडिट कसे करायचे येथे घोडे अडले. मग जिल्ह्यातील एका बड्या असामीला निरामय खुणावू लागले. बंद असलेले हॉस्पिटल ट्रस्टकडून आपण ताब्यात घेतले तर नवा धंदा सुरु करता येईल. हा त्यामागचा उद्देश होता. त्यामुळे कोविड सेंटरसाठी शासकीय स्तरावर सुरु असलेले प्रयत्न थांबविण्यासाठी कळ दाबली गेली. पण पुढे या असामीने देखील निरामयचा नाद सोडला. त्यामुळे पुन्हा एकदा निरामय सुरु होण्याची गुहागरवासीयांची आशा मावळली.
मात्र भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी परत एकदा निरामयबाबतच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची चर्चा जोरात सुरु आहे. नव्या ठिकाणी महाविद्यालय बांधायचे तर युजीसी बोर्डाच्या नियमावलीप्रमाणे काही एकर जागा घ्यावी लागणार. त्यामध्ये महाविद्यालयाची इमारत, प्राध्यापक आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी कॉटेज, वसतीगृह, क्रीडांगण, आदी सुविधा उभ्या कराव्या लागणार. काही कोटींमध्ये व्यवहार होणार. बांधकाम किमान चार पाच वर्ष सुरु रहाणार. म्हणजे मग दलाली, कमिशन, भ्रष्टाचार आदी अनेक गोष्टींचा तेथे शिरकाव होणार.
या सगळ्याला छेद देत डॉ. विनय नातू यांनी निरामय हॉस्पिटलमध्येच वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे. अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. निरामयच्या वास्तू लगत डॉक्टरांसाठी वसाहत आहे. विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची व्यवस्थाही तयार आहे. हॉस्पिटलच्या समोर मोठे क्रीडागंणही आहे. अन्य इमारती बांधकाम करायचे झाले तर रिकामी जागा देखील आहे. त्यापैकी बहुतांशी जागा ट्रस्टच्या व एमआयडीचीच्या मालकीची आहे. त्यामुळे अत्यल्प खर्चात वैद्यकीय महाविद्यालय निरामयचे ठिकाणी सुरु होवू शकते. अशी डॉ. नातूंच्या पत्राची मांडणी आहे.
पण या सर्व गोष्टीत एक गुढ तिढा आहे. निरामय सुरु झाल्यानंतर दिड वर्षात तेथे घोटाळा झाला. व्यवस्थापन बदलून पुन्हा रुग्णालय सुरु होईपर्यंत दाभोळ वीज कंपनीनेच गाशा गुंडाळला. यापूर्वी राज्यमंत्री असताना आमदार भास्कर जाधव यांनी देखील निरामय सुरु करण्यासाठी प्रयत्न केले होते. एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो पूर्ण करण्याचा स्वभाव असलेल्या आमदार जाधवांनी देखील निरामयचा नाद सोडून दिला होता. कोविड केअर सेंटरसाठी इमारत घेण्यासंदर्भात ट्रस्टसोबत जी बोलणी झाली. त्यावेळी किल्लीचे नाट्य समोर उभे राहीले. त्यानंतर ट्रस्टीमध्ये वाद असून प्रकरण न्यायालयात असल्याची चर्चा झाली. परिणामी कोविड केअर सेंटरची जागा बदली लागली. हा सर्व प्रवा पहता निरामय हे प्रकरण वाटते तितके निरामय नाही. कोणीतरी अशी मेख मारुन ठेवली आहे की हा तिढा कोणालाच सुटत नाही. आता डॉ. नातूंनी लिहिलेल्या पत्रावर राज्य सरकारने गांभिर्याने विचार केला आणि खरोखरच वैद्यकीय महाविद्यालय निरामयचे इमारतीत होण्यासाठी प्रयत्न सुरु झाले तर गुहागरवासीयांचे भाग्यच उजळले असेच म्हणावे लागेल.