गुहागर ता. 04 : येथील पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी आणि 23 पोलीस कर्मचाऱ्यांनी गुहागर बसस्थानकात दंगा काबु योजनेची रंगीत तालीम केली. डोक्यावर हल्मेट, हातात फायबर शिल्ड आणि दंडुका, काहींच्या हातात बंदुका असलेले पोलीस बसस्थानकात जमल्याने गुहागरमध्ये काहीतरी अघडीत घडणार असल्याची चर्चा गुरुवारी सायंकाळी शहरात पसरली होती. मात्र बसस्थानकावर जमलेल्या लोकांना हा सरावाचा भाग असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी अफवा थांबविल्या.


डिसेंबर महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. 6 डिसेंबरला विश्र्व हिंदू परिषद विजय दिन साजरा करतो. 25 ते 31 डिसेंबर नाताळच्या सुट्टी व 1 जानेवारीला नववर्ष स्वागत. अशा पर्यटन हंगामात मोठी वाढ होणार आहे. अशावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलीसांनी घेतलेल्या जातीय दंगा काबु योजनेच्या प्रशिक्षणाची तालीम करावी. असे आदेश रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून देण्यात आले होते. त्याप्रमाणे गुहागर पोलीसांनी गुरुवारी सायंकाळी बसस्थानक परिसरात सराव केला. यामध्ये लाठीचार्ज कसा करावा. गोळीबार करण्याची वेळ आली तर कोणत्या पध्दतीने बसून गोळीबार करावा. दंगेखोरांना एका सीमीत परिसरात कसे रोखावे. दगडफेकीसारख्या घटना घडल्या तर आपला बचाव कसा करावा. आदी गोष्टींचा सराव केला. यावेळी पोलीस निरिक्षक अरविंद बोडके यांनी मार्गदर्शन केले.