तात्काळ बंद करण्याचे अध्यापक संघाची मागणी
रत्नागिरी : सोमवार 4 ऑक्टोबरपासून शहरी भागातील इयत्ता 8 वी ते इ.12 वी चे वर्ग व ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग सुरू करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नुकताच आदेश काढला आहे. त्यानुसार शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून या शाळांना सूचना देण्यात आल्या असून बहुतांशी शाळांमध्ये सोमवारपासून शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. परंतु अद्याप शहरातील काही शाळांमध्ये लसीकरण केंद्र व तपासणी केंद्र कार्यान्वित असल्याने या शाळा कधी सुरू होणार असा प्रश्न पालक वर्गासमोर निर्माण झाला आहे. विशेष बाब म्हणजे सोमवारपासून शाळा सुरू होत असतानादेखील अद्याप शिक्षकांच्या कोवीड ड्यूटी सुरू आहेत. यामुळे शिक्षकांसमोर देखील शाळेत कसे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळांमधील कोवीड विषयक कामकाज व शिक्षकांची कोवीड ड्युटी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.
राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मार्च 2020 पासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर इयत्ता नववी, दहावी व बारावीचे वर्ग काही काळासाठी सुरू करण्यात आले होते.हा अपवाद वगळता इतर सर्व वर्ग मार्च 2020 पासून पूर्णतः बंद आहेत. सध्या राज्यातील कोरोनाचा प्रसार मंदावला असल्याने राज्य शासनाने सोमवार दि 4 ऑक्टोबर पासून ग्रामीण भागातील 5 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते इ.12 वी चे वर्ग सुरू करण्याबाबत परवानगी देणारा शासन आदेश नुकताच निर्गमित केला आहे. यानुसार शाळास्तरावर तयारी सुरू झाली असून बहुतांशी पालकांनीदेखील शाळा सुरू करण्यास संमती दिली आहे.परंतु शहरामधील काही शाळांसमोर वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील शहरामधील काही शाळांमध्ये अजूनही कोविड टेस्टिंग सेंटर व लसीकरण केंद्र सुरू आहेत. शिक्षण विभागाला शहरातील या शाळा सुरू व्हाव्या असे वाटत नाही का असा प्रश्न संबंधित शाळेतील शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे. या शाळांमधील सेंटर बंद झाल्यानंतर आरोग्य विभागाने काळजीपूर्वक शाळांचे निर्जंतुकीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासन याबाबत कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील शिक्षकांची अद्यापही लसीकरण केंद्र व तपासणी केंद्रावर नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागाला शासन निर्णयाची अंमलबजावणी करायची नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिक्षकांची कोरोना ड्यूटी व शाळांमधील कोरोना विषयक कामकाज तात्काळ बंद करा अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले. शिक्षकांची कोरोना ड्यूटी व शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही याबाबत अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शिक्षण विभागाकडेही याबाबत तत्परता पहायला मिळत नाही. शिक्षकांची कोरोना ड्यूटी रद्द करण्याबाबत व शाळांमधील कोरोना विषयक कामकाज बंद करण्याबाबत शिक्षणाधिकारी स्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा होणे आवश्यक असल्याचे सागर पाटील यांनी सांगितले.