जिल्हा परिषदेकडून डिसेंबरची पेन्शन अजून जमा नाही
गुहागर, ता. 14 : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबरचे निवृत्ती वेतन 30 डिसेंबरलाच मिळाले. मात्र निवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांचे निवृत्ती वेतन जानेवारीचा अर्धा महिना उलटून गेला तरी मिळालेले नाही. हे निवृत्ती वेतन कधी मिळणार? (When Retired Teachers get Pension) असा प्रश्र्न जिल्हा परिषद सेवा समितीचे तालुका कार्याध्यक्ष दिवाकर कानडे यांनी उपस्थित केला आहे.


कानडे म्हणाले की, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, तहसीलदार कार्यालय, माध्यमिक शिक्षक आदी राज्य सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारे डिसेंबर महिन्याचे निवृत्ती वेतन 30 डिसेंबरलाच मिळाले. मात्र रत्नागिरी जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या निवृत्त प्राथमिक शिक्षकांना डिसेंबर महिन्याचे निवृत्ती वेतन अजुनही मिळालेले नाही. (When Retired Teachers get Pension) सर्वसाधारणपणे जिल्हा परिषदेकडून दर महिन्याचे वेतन पुढील महिन्याच्या 5 ते 6 तारखेपर्यंत खात्यात जमा होते. मात्र यावेळी जानेवारी महिन्याची 14 तारीख उलटून गेली तरी अजूनही निवृत्ती वेतन खात्यात जमा झालेले नाही. लागोपाठ 15 (शनिवार) व 16 (रविवार) जानेवारीला सुट्टी असल्याने निवृत्ती वेतन मिळण्यास अजून 4 दिवस लागतील. अशा परिस्थितीत कर्ज घेतलेल्या, व्याधीग्रस्त, मुले बेरोजगार असलेल्या निवृत्त शिक्षकांनी करायचे काय. निवृत्ती नंतरचे आयुष्य जगताना निवृत्ती वेतनावर काही आर्थिक गणिते बांधलेली असतात. ही गणिते चुकली की वयोपरत्वे चिंता वाढते. (When Retired Teachers get Pension) याचा विचार वरिष्ठांनी करावा. अशी विनंती यावेळी दिवाकर कानडे यांनी केली.