मुंबई : 11वी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा येत्या 21 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरु झाली. पण अर्ज करताना विद्यार्थ्यांना वेबसाईटवर अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. तसेच, मंगळवार आणि बुधवार या दोन्ही दिवसात बराच वेळ ही वेबसाईट बंद देखील होती. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले. ही बाब लक्षात घेता वेबसाईट तांत्रिक कारणासाठी बंद ठेवण्यात आली असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
अकरावी सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थी http://cet.mh-ssc.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरत होते. पण अर्ज करताना विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता तांत्रिक कारणांसाठी बोर्डाकडून ही वेबसाईट बंद करण्यात आली आहे. वेबसाईट पूर्ववत सुरु झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
तसेच, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप सीईटी परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरला नाही किंवा अर्ज भरत असताना तांत्रिक अडचणी आल्या असतील तर या विद्यार्थ्यांना वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर परीक्षेचा ऑलाईन अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. बोर्डाकडून या वेबसाईटवरील तांत्रिक अजचणी दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. वेबसाईट पूर्ववत झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना टेन्शन घेण्याचे कारण नाही.