अनेकजण लसीकरण केंद्रावर जाऊन रोज हजेरी लावतात
गुहागर : तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भावर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. कोविड लसीकरणाच्या माध्यमातून कोरोना विरोधातील लढाई अधिक तीव्र करण्यात आली असतानाच लसीचा तुटवड्यामुळे येथील गुहागर ग्रामीण रुग्णालयासह अन्य लसीकरण केंद्रावरील लसीकरण आरोग्य विभागाला बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. मात्र अनेक नागरिक लसीकरणासाठी रोज या केंद्रावर हजेरी लावून येत असल्याचे दिसत आहे.
मंगळवारपासून गुहागर ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे. तर अन्य केंद्रावर रविवारपासून साठा संपल्याने लसीकरण बंद करण्यात आले आहे. लसीची उपलब्धता झाल्यानंतरच लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण सापडून येत आहेत. रुग्ण संख्या वाढू लागल्याने लसीची मागणी करण्यात येत आहे. तालुक्यातील ७५७ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली व आबलोली या तीन ठिकाणी लसीकरण केले जात होते. तर १ एप्रिलपासून हेदवी, तळवली, कोळवली, आबलोली वेळणेश्वर या उपकेंद्रामध्येही लसीकरण सुरू करण्यात आले होते. परंतु आता सर्वच ठिकाणी संपलेल्या बंद ठेवण्यात आले आहे.