27.8.2020
गुहागर : तालुक्यातील बौऱ्या गावात समुद्रात विसर्जनसाठी गेलेले दोन तरुण बेपत्ता झाले. वैभव वसंत देवाळे आणि अनिकेत हरेश हळ्ये अशी या तरुणांची नावे असून ते अडूर भाटलेवाडी येथे रहातात. गौरी गणपती विसर्जनाचे वेळी ही घटना घडल्याने अडूर गावावर शोककळा पसरली आहे. अडूर, बोऱ्या आणि कोंडकारुळ परिसरातील मंडळी गणपती विसर्जनासाठी बोऱ्या समुद्रकिनारी जातात. अडूर भाटलेवाडी येथील मंडळी गौरी गणपती विसर्जनासाठी बोऱ्या समुद्रकिनारी गेली होती. त्यावेळी वैभव वसंत देवाळे (वय 35) आणि अनिकेत हरेश हळ्ये (वय 22) हे दोन तरुण अन्य तिघांसोबत मोठी गणेशमूर्ती घेवून किनाऱ्यावरील जेटीवर गेले होते. गणेशमुर्ती विसर्जन करताना मोठी लाट आली. या लाटेत पाचही युवक तोल जावून समुद्रात पडले. त्यापैकी तिघांनी पोहत समुद्रकिनारा गाठला. मात्र वैभव आणि अनिकेतला पोहता येत नसल्याने ते समुद्रात बुडाले. रात्री उशिरापर्यंत स्थानिक ग्रामस्थांसह मच्छीमारांच्या मदतीने दोघांचा शोध घेण्यात येत होता.