शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांचा भाजपला टोला
30.08.2020
गुहागर : भाजपाने घंटानाद करून राज्यातील विद्यामंदिरे सुरु करण्यासाठी आग्रह धरावा असा टोला शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी लगावला आहे. कोरोना महामारीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झालेली असताना भाजपला केवळ राजकारण सुचत आहे. हे दुर्दैवी असल्याचेही बाईत यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात मार्च महिन्यापासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. ती सुरु व्हावीत यासाठी भाजपने शनिवारी (ता. 29) राज्यभरातील मंदिरांमध्ये घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनांच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्यावर टिका करण्याची संधी भाजपने सोडली नाही. त्यामुळे शिवसैनिक दुखावले गेले आहेत.
भाजपच्या टिकेला उत्तर देताना शिवसेनेचे गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत म्हणाले की, भाजपच्या हातून सत्ता गेल्याने ते सैरभैर झाले आहेत. राज्यात कोरोना महामारीमुळे बिकट परिस्थिती उभी राहिली आहे. याचे भान भाजपला राहिलेले नाही. अशा कठीण काळात देखील त्यांना फक्त राजकारण सुचते हे दुर्दैवी आहे. राज्य सरकार कोरोना महामारीचा उत्तमपणे मुकाबला करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी कोरोना विरुद्ध दिलेल्या लढ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीपासून उत्तम उपाययोजना राबवल्यामुळेच कोरोना आटोक्यात राहिला आहे.
मंदिरे चालू झाली पाहिजेत असे आम्हांलाही वाटते. पण आज राज्यातील सर्व देवस्थांनांमध्ये गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नाही. त्यामुळे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तारेवरची कसरत करावी लागेल. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात देवस्थानांमध्ये गर्दी झाली तर त्यांचे परिणाम काय होतील याचा विचार केला पाहिजे. याउलट शाळा व महाविद्यालयात शिपाई, अन्य कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य अशी मोठी यंत्रणा उपलब्ध आहे. गर्दीचे नियोजन करणे, गर्दी रोखणे, प्रादुर्भाव टाळणे यासाठी काही उपाययोजनांची अंमलबजावणी शाळा महाविद्यालयात होऊ शकते. त्यामुळे मंदिरे चालू करण्याआधी विद्यामंदिरे चालू करण्यासाठी भाजपाने प्रयत्न करावेत. असा सल्ला तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी दिला आहे.