ग्रामस्थ, व्यापार्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत काम करून न देण्याचा इशारा
गुहागर : गुहागर – विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे शृंगारतळी बाजारपेठेतून काम करताना या रस्त्यांची उंची किती याबाबत ग्रामस्थ व व्यापाऱ्यांचे समाधान होत नाही, तोपर्यंत काम करून न देण्याचा निर्णय बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
गुहागर – विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे गुहागर तालुक्यातील बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या वतीने घेतलेल्या बैठकीत प्रांताधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता यांनी शृंगारतळी बाजारपेठेतून काम करताना ग्रामस्थ व व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले जाईल, असे सांगितले होते. परंतु बाजारपेठेतील रस्त्यासाठी नक्की किती क्षेत्र जाणार याची माहिती दिलेली नाही. तालुक्यातून गेलेल्या महामार्गाची उंची वाढवल्याने या पावसात काही ठिकाणी पाणी तुंबून घरामध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडले. तर काही ठिकाणी घरे व दुकानांच्या वर रस्ता गेल्यामुळे येथील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. हे लक्षात घेऊन शृंगारतळी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सोमवारी भवानी सभागृहात महामार्गाच्या होणाऱ्या कामाबाबत बैठक घेतली. यावेळी शृंगारतळी बाजारपेठेतील रस्त्याची उंची वाढविल्यास अनेक अडचणी निर्माण होतील. त्यामुळे जोपर्यंत रस्त्याची उंची किती असेल याबाबत संबंधित अधिकारी चर्चा करत नाहीत, तोपर्यंत बाजारपेठेतील महामार्गाचे काम करून न देण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला आहे. याबाबत संघटनेने आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतली असता त्यांनी दिवाळीनंतर बाजारपेठेतील रस्त्यासंदर्भात संबंधित अधिकारी व व्यापारी अशी संयुक्त बैठक घेऊ असे आश्वासन दिले आहे.
या बैठकीला सरपंच संजय पवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर, नासीमशेठ मालाणी, विशाल बेलवलकर प्रवीण पटेल, मोहन संसारे, बाळा संसारे, रुपेश शिगवण, गणेश संसारे, अल्ताफ मालाणी आदींसह अन्य व्यापारी उपस्थित होते.