अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांचे प्रतिपादन
गुहागर : आपले बालपण व सध्याचे जीवन पुण्यासारख्या शहरात गेलेले असून त्यानंतर मला कोकणचे विशेष आकर्षण राहिले आहे. कोकणातील पर्यटन म्हणजे सुखद आनंदाचा ठेवा असून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात आल्यावर आपल्याच घरी आल्याची अनुभूती घेता येते असे प्रतिपादन मी सिंधुताई सपकाळ फेम अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांनी केले.
नववर्षाच्या स्वागतासाठी गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे आपल्या कुटुंबियांसमवेत आल्या असताना त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी मनमोकळा संवाद साधला.विविध मालिका, चित्रपट, नाटक यांद्वारे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवललीे ही गुणी अभिनेत्री सध्या यूट्यूब चॅनल आणि स्टोरीटेल अॅप च्या माध्यमातून रसिकांना विविध विषयांवरील मार्गदर्शनपर माहिती उपलब्ध करून देत आहे. विविध कार्यक्रम तसेच नाटकांच्या माध्यमातून कोकणात येणे होत असते.या ठिकाणचा प्रेक्षक हा कलेची उत्तम जाण असणारा दर्दी रसिक आहे मात्र मुंबई, पुणे वगळता आपल्या राज्यात अन्यत्र नाट्यगृहांची कमतरता जाणवत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. गगनाला पंख नवे, जे थ्री जंक्शन, दुहेरी यांसारख्या मराठी मालिका मेरी आशिकी तुमसे,दिया और बाती हम यांसारख्या हिंदी मालिका, संगीत सम्राट या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन, डम डम डिगा डिगा, सनई चौघडे, हायवे (मराठी), मी सिंधुताई सपकाळ,एक तारा यांसारख्या विविध चित्रपट मालिकांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलेली उर्मिला निंबाळकर मुळची इंदापूर तालुक्यातील सणसर या गावची असून तिचे आजोळ सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आहे. प्राथमिक शिक्षण इंदापूर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून पूर्ण केले आहे. शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच विविध कार्यक्रमातून सूत्रसंचालन, अभिनय, नृत्य यांचे शिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि त्याचा उपयोग सध्याच्या आयुष्यात होत आहे. नवोदित कलावंतांनी आपल्या स्थानिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वतःला घडवावे. त्यासाठी आपल्या कुटुंबाचा पाठिंबा घ्यावा. हे सर्व करताना आपले शिक्षण मात्र सोडू नये असा सल्ला त्यांनी नवोदितांना दिला. अनेक प्रायोगिक संस्थांच्या माध्यमातून कलावंत घडवण्यासाठी प्रयत्न केले जातात त्यांचा लाभ घ्यावा. या क्षेत्रातील मालिका, चित्रपट, नाटक यांसारखी माध्यमे ही स्वतंत्र असून त्यांची तुलना होऊ शकत नाही असे मत त्यांनी मांडले.
कोरोना आपत्तीच्या काळात सर्व कामे थांबली असताना आपला प्रेक्षकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून यूट्यूबच्या माध्यमातून रसिकप्रेक्षकांना पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. युट्युब वर इंग्रजी नंतर मराठीलाच मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिल्याचे दिसून येत असून आपणही आपला चॅनल मराठी माध्यमातच सुरू केल्याचं त्या अभिमानाने सांगतात. आपल्या चॅनलचे चार लाख एकेचाळीस हजार पर्यंत सबस्क्राइबर झाले असून युट्युब ने कॅलिफोर्निया येथून सिल्वर बटन हा पुरस्कार देऊन आपल्या कार्याचे कौतुक केले आहे.आपले पती सुकीर्त गुमास्ते यांच्यासह स्टोरीटेल च्या माध्यमातून खास रसिकांसाठी विविध कथांचे सादरीकरण केले जाते. त्या कथांना मी आवाज देते असे त्यांनी सांगितले. पॉडकास्ट-द उर्मिला शो याद्वारे विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांना बोलावून मानसोपचार, आहार, व्यायाम, संस्कृतिक, कला आदी विविधांगी विषयांवर चर्चा घडवून ती रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले. ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा जीवन प्रवास उलगडून दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कोकणातील माणसांची आपुलकी आणि येथील आल्हाददायक वातावरणात पुन्हा पुन्हा यायला आवडते असेही अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सांगितले.