रत्नागिरी : चिपळुणमध्ये पाणी शिरू लागले आणि त्याची बातमी गुहागरात संघ कार्यकर्त्यांना समजल्यावर काही तासांत यंत्रणा सज्ज करण्यास प्रारंभ झाला. गुहागरमध्येही त्यावेळी भरपूर पाऊस होता. परंतु २००५ चा पूर आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये कसे काम करायचे हे माहिती असल्यामुळे गरजेच्या कपडे आणि अन्य वस्तूंची यादी तयार करून त्यानुसार नियोजनबद्द काम सुरू केले. चिखल, गाळ भरपूर साचणार असल्याने कपडे आणि लोकांना पिण्यासाठी पाण्याची निकड घेऊन सुरवातीला हे गोळा करण्यासाठी आवाहन केले. त्याला गुहागर, असगोली, अंजनवेल, गुहागर, पालशेतमधून प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी सायंकाळी पाणी ओसरत आहे म्हटल्यावर गुहागर, अंजनवेल आणि आरजीपीएलमधून उपलब्ध झालेले पाणी तातडीने वडनाका इथे पाठवले.
गुहागर शहरातून संध्याकाळी पाणी आणि कपडे गोळा करण्यासाठी चार संकलन केंद्रांची नावे सोशल मीडियावरून जाहीर केली आणि मदत मिळू लागली. शुक्रवारी संकलन केंद्रात कपडे ढीग गोळा झाले. आरजीपीपीएलनेही संकलन केले. त्यानंतर याच्या वर्गीकरणासाठी भंडारी भवनात सर्व कपडे नेण्यात आले. तिथे संकलन सुरू केले. एका महिलेसाठी २ साड्या, २ शर्ट, पॅंट या हिशेबाने ५ हजार लोकांसाठी कपडे संकलित झाले. लहान मुले, पुरुष, स्त्रियांसाठीचे कपडे असे वर्गीकरण राष्ट्रसेविका समितीच्या ४० सेविकांनी केले. तब्बल पाच हजार जणांना पुरेल एवढे कपडे जमा झाले. रविवारी दुपारी भंडारी भवनमध्ये जमून उर्वरित कपडे कुठे वाटायचे याचे नियोजन केले.
दुसऱ्या दिवशी लगेचच वाटपासाठी चिपळुणला संघ स्वयंसेवक रवाना झाले आणि गरजूंना त्याचे वितरण केले. मुरादपुर, शंकरवाडी, बहादुरशेख नाका, वडार कॉलनी या ठिकाणी सुमारे २५०० जणांना कपडे वितरण केले. १० जणांची टीम कार्यरत होती. शिवाय ज्याला जे कपडे हवे होते, त्यांना ते दिले. प्रत्येकाला वडार कॉलनीत भाकऱ्या, पोळ्या चटणी असे १००० जणांना एकवेळ पुरेल, असे जेवण दिले.
रविवारी मंत्री चिपळुणात असल्यामुळे त्या दिवशी स्वयंसेवकांनी गुहागरमध्येच पुन्हा जमलेल्या साहित्याचे वर्गीकरण केले. त्यानंतर २६ जुलैला चिपळूण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील वडार कॉलनी येथील ३० कुटुंब, कोळकेवाडी पुनर्वसन वसाहत २० कुटुंब, खांदाट भोईवाडी २५ कुटुंब, शिगवण वाडीतील २० कुटुंब, खेर्डी शेंबेकर चाळ येथील १० कुटुंब यांना धान्य किट आणि कपडे पोहोच करण्यात आले. कोणताही गाजावाजा न करता आणि फोटोग्राफी करून प्रसिद्धी करण्यापेक्षा वेळेत मदत पोहोचवण्याचे कार्य संघ स्वयंसेवक व गुहागरकरांनी केले आहे.