माजी आमदार डॉ.विनय नातू यांचा आरोप
गुहागर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमैया यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल या भीतीपोटी सोमैया यांनाच चार भिंतीआड दडवून संकटापासून वाचविण्याची ठाकरे सरकारची युक्ती म्हणजे पळपुटेपणाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचाच प्रकार असून, अशा भ्याडपणामुळे राज्यातील भ्रष्टाचारास पाठबळ मिळत आहे, असा आरोप भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी सोमवारी केला.
Senior BJP leader and former MP on the tour of Dr. Kirit Somaiya The Thackeray government’s ploy to save Somaiya from the crisis by hiding behind four walls for fear that law and order situation will deteriorate due to NCP workers is a way to continue the tradition of absconding, such cowardice is supporting corruption in the state. Vinay Natu did it on Monday.
भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालून तो उघडकीस आणणाऱ्यांवरच कारवाई करण्याच्या तालिबानी धोरणामुळेच ठाकरे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असून केवळ दडपशाही करून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आता सुरू आहे, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या संकटास तोंड देण्याऐवजी ठाकरे सरकारने जनतेस घरात बसावयास भाग पाडले. त्यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला. शाळांना कुलुपे लावून विद्यार्थ्यांना घरात बंद केले, त्यामुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला. आता कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यासाठी नाकर्ते ठाकरे सरकार सरसावले आहे, हेच सोमैय्या यांच्यावरील कारवाईवरून स्पष्ट दिसत आहे, असे डॉ.नातू म्हणाले. या पळपुट्या सरकारमुळे राज्यात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अपयश झाकण्याकरिता दडपशाही करणाऱ्या ठाकरे सरकारने स्वतःच्याच कारभारावर प्रश्नचिन्हे निर्माण केली आहेत. धोरण आणि निर्णयाची कोणतीही क्षमता नसल्यामुळेच कोणत्याही प्रश्नावर भूमिका न घेता, प्रश्नच दडपण्याच्या धोरणामुळे ठाकरे सरकारने राज्याच्या जनतेस असुरक्षिततेच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले असून गुन्हेगारांना मात्र मोकाट सोडले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना खंडणीप्रकरणी कारवाईचा ससेमिरा चुकविण्यासाठी लपूनछपून वावरावे लागत असून या प्रकरणी पोलिसांचा वापर केल्याच्या आरोपामुळे पोलीस दल बदनाम झाले आहे. देशाच्या सुरक्षिततेला आव्हान असलेल्या अतिरेकी कारवायांचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होत असताना राज्याचे पोलीस दल मात्र, सोमैय्या यांच्यावरील अनैतिक कारवाईसाठी बळ वाया घालवत आहे. राज्यात महिलांवर अत्याचार वाढत असून संजय राठोड नावाच्या मंत्र्यामुळे सरकारची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्यांमुळे सरकारच्या प्रतिमेचे वाभाडे निघत असताना त्यांनाही पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे उघडी पडली आहेत, आणि सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप होत आहेत. यामुळे अस्वस्थ असलेले पक्षाचे कार्यकर्ते सरकारी पाठबळावर पोलिसांदेखत हाणामाऱ्या करीत असून कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडवत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. अशा घटना रोखण्याऐवजी, ज्यांना त्यापासून धोका आहे त्यांनाच ताब्यात घेत, असे प्रकार रोखण्याची हिंमत नसल्याचीच कबुली ठाकरे सरकार देत आहे, असा आरोपही डॉ.विनय नातू यांनी केला. सूडबुद्धीने कारवाया करून ठाकरे सरकारने राज्यात आणीबाणीहूनही भयानक अशी तालिबानी राजवट सुरू केली असून जनतेच्या मनात संताप खदखदत आहे. सरकारने वेळीच जागे व्हावे आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याऐवजी सत्याला सामोरे जाऊन कारवाईची हिंमत दाखवावी, असेही ते म्हणाले. पक्षाचे नेते डॉ. किरीट सोमैया यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत संपूर्ण पक्ष त्यांच्यासोबत असून ही लढाई निर्णायक शेवटापर्यंत लढली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.