गुहागरातील कलावंतांचे आ. भास्करराव जाधवांना साकडे
गुहागर : महाराष्ट्राची देव भूमी म्हणजे कोकण. कोकणामध्ये भजन-कीर्तन, दशावतार, तमाशा, नमन, शक्ती – तुरा या लोककलांचे माहेरघर. या लोककलेच्या माध्यमातून कोकणातील लोककलावंत भक्ती बरोबर समाजसेवेचे काम करून एक सुसंस्कृत समाज घडवण्याचे कार्य करत असतात. परंतु, सध्या कोरोनाच्या संकटामुळे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याने या कलावंतावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून कोकणातील कलावंतांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशा आशयाचे निवेदन गुहागर तालुक्यातील लोक कलावंतांनाकडून आ. भास्करराव जाधव यांना निवेदन देण्यात आले. आपण कलावंतांना राज्य शासनातर्फे आर्थिक मदत मिळवून द्या, असे साकडे त्यांना घातले.
या निवेदनात म्हटले आहे की, एकटा कलाकार आपली कला सादर करू शकत नाही. त्यासाठी अनेक कलाकारांना एकत्र यावे लागते. त्यामध्ये पेटी वादक, पखवाज वादक, तबला वादक, टाळ वादक, झांज वादक, विविध कलाकार, लोकशाहीर, गायक कलाकार त्याचप्रमाणे रंगभूषा, वेशभूषा, ध्वनी संकलन या सर्वांना एकत्र घेऊन अनेक मंडळे, संस्था लोककलेच्या माध्यमातून कार्यक्रम करत असतात. आपली कला यशस्वी सादर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च हे कलाकार करत असतात. या लोककलेवरच कुटुंबाचा चालवत असतात. परंतु, कोरोना महामारी सुरू झाल्यापासून लोककलेवर मोठे संकट कोसळले आहे. कोणतेच कार्यक्रम होत नसल्याने कलावंतांची आर्थिक कोंडी झाली आहे. शासनाच्या विविध निर्बंधांमुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. जर हि अशीच परिस्थिती राहिली तर लोककला जपणारा कलावंत नामशेष होऊन लोककला लोप पावतील. म्हणूनच कोकणातील या सर्व लोककला जिवंत ठेवण्यासाठी व जपण्यासाठी लोककलावंतांना आर्थिक मदतीची गरज असल्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी लोककलावंत मिनार पाटील, संतोष पांचाळ, संदेश हुमणे, गौरव शेटे, सुधाकर गावणकर, सुरज देवळेकर सुबोत पाडावे, प्रदीप विचारे, प्रतीक शेटे, सुदेश भागडे, राजेश मिस्त्री आदी उपस्थित होते.