केंद्राचा राज्यांना दक्षतेचा सल्ला
नवी दिल्ली : कोरोना विषाणू साथीची दुसरी लाट अद्याप संपलेली नसल्याने केंद्र सरकारने शुक्रवारी लसीकरणावर भर देणे आणि नियम-निर्बंध पाळणे आवश्यक असल्याचा सल्ला राज्यांना दिला. अद्याप देशात ७१ जिल्ह्य़ांत संसर्गदर १० टक्क्य़ांहून अधिक असल्याचेही केंद्राने स्पष्ट केले.
देशभरात सलग २५ दिवस करोनाचा सरासरी संसर्गदर ५ टक्कय़ांपेक्षा कमी आहे. आठवडाभरात दैनंदिन रुग्णवाढीतही १३ टक्कय़ांची घट झाली आहे. पण ७१ जिल्ह्यांमध्ये अजूनही संसर्गाचे प्रमाण १० टक्कय़ांपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्यांतील परिस्थिती आटोक्यात असली तरी, केरळ, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओदिशा आणि मणिपूर या सहा छोटय़ा राज्यांमध्ये रुग्ण वाढू लागले आहेत. करोना साथीची दुसरी लाट सरली नसल्याने राज्यांना दक्षता घ्यावी लागेल, अशी सूचना करोना कृतिगटाचे प्रमुख आणि निती आयोगाचे (आरोग्य) सदस्य व्ही. के. पॉल यांनी केली.
युरोप, इस्रायल, रशियात पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. काही देशांनी निर्बंध लागू केले आहेत. सध्या भारतात करोनाचा प्रादुर्भाव पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकलेला दिसत आहे. त्यामुळे पूर्वेकडील छोटय़ा राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यात येणार आहेत. पण अन्य राज्यांतही स्थानिक स्तरावर करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल करणे वा कठोर करणे याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल, असे मत डॉ. पॉल यांनी व्यक्त केले. दर १४ दिवसांनी जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेण्याची सूचनाही केंद्राने राज्यांना केली आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात ४६,६१७ नव्या रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे बाधितांची संख्या तीन कोटी चार लाख ५८ हजार २५१ वर पोहोचली आहे. ५.०९ लाख रुग्ण उपचाराधीन असून शिखर काळातील संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ८६ टक्कय़ांनी कमी झाले आहे. आत्तापर्यंत २.९५ कोटी रुग्ण करोनामुक्त झाले असून दुसऱ्या लाटेतील करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९७ टक्कय़ांवर गेले आहे. दैनंदिन रुग्णवाढीचे सरासरी प्रमाण कमी होत असले तरी, मृत्यूची संख्या मोठी आहे. गेल्या २४ तासांमध्ये ८५३ मृत्यूची नोंद झाली. देशभरातील एकूण करोना बळींची संख्या ४ लाखांहून अधिक झाली आहे. देशातील १०० जिल्ह्य़ांमध्ये दैनंदिन रुग्णवाढ शंभराहून जास्त होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिली.
१०० मीटर नव्हे, मॅरेथॉन!
डिसेंबपर्यंत १०८ कोटी लोकांच्या लसीकरणाचे लक्ष्य केंद्राने ठेवले असले तरी, सध्याचा प्रतिदिन लसीकरणाचा वेग पाहता डिसेंबरअखेर ९३ कोटी नागरिकांचे लसीकरण होऊ शकेल. सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात वर्षअखेरीपर्यंत लसीकरणाचे लक्ष्य १३५ कोटी असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भात, ही १०० मीटरची शर्यत नसून, मॅरेथॉन असल्याचे सांगत डॉ. पॉल यांनी, लसीकरणाचा वेग परिस्थितीनुसार बदलू शकतो, असे स्पष्ट केले.
‘जॉन्सन’ लशीचे हैदराबादमध्ये उत्पादन
देशातील लशींमध्ये झायडस कॅडिला आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या लशींची भर पडू शकेल. ‘झायडस’ने औषध महानियंत्रकांकडे केलेल्या अर्जाचे मूल्यमापन सुरू आहे. ‘जॉन्सन अँड जॉन्सन’शी केंद्र सरकार चर्चा करीत असून ही लसही हैदराबादमधील ‘बायो-ई’ कंपनीद्वारे उत्पादित केली जाईल, अशी माहिती पॉल यांनी दिली.
लसीकरण प्रगती
’आत्तापर्यंत १८-४५ वयोगटातील १५.८ टक्के व्यक्तींना पहिली मात्रा.
’८० टक्के आरोग्यसेवकांचे तर, अन्य करोनायोद्धय़ांपैकी ९० टक्के व्यक्तींचे लसीकरण पूर्ण.
’४५ पेक्षा जास्त वयोगटातील ६० टक्के व्यक्तींनाही दुसरी लसमात्रा.
’लसीकरणाचा दैनंदिन वेग जानेवारीतील प्रतिदिन २.३५ लाख मात्रांवरून आता जूनमध्ये ३९.८९ लसमात्रांवर.
’एप्रिलमध्ये प्रतिदिन २९.८६ लसमात्रा दिल्या गेल्या, मेमध्ये हे प्रमाण १९.६९ लसमात्रांपर्यंत घसरले.
‘जॉन्सन’ची एकच मात्रा पुरेशी :
‘जॉन्सन’च्या लशीची फक्त एक मात्रा घ्यावी लागेल आणि ही लस ‘डेल्टा’ उत्परिवर्तित विषाणूंविरोधात प्रभावी ठरेल, असा दावा कंपनीने केला आहे. केंद्राने ‘मॉडर्ना’ या परदेशी लशीलाही मान्यता दिली असून आतातरी ‘कोव्हॅक्स’ यंत्रणेमार्फत भारताला या लशी देणगी स्वरूपात मिळतील. रशियन बनावटीच्या ‘स्पुटनिक’ या एकमेव परदेशी लशीचे भारतात उत्पादन होत आहे.
देशात ४६,६१७ नवे करोनाबाधित
एका दिवसात ४६,६१७ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याने देशातील बाधितांची एकूण संख्या तीन कोटी चार लाख ५८ हजार २५१ वर पोहोचली आहे. गेल्या एका दिवसात करोनामुळे ८५३ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या चार लाख ३१२ वर पोहोचली आहे.
सहा राज्यांत केंद्रीय पथके
रुग्णसंख्या वाढत असल्याने साथ योग्य प्रकारे हाताळण्यासाठी केरळ, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओदिशा, छत्तीसगड, मणिपूर या राज्यांमध्ये केंद्र सरकार पथके पाठवणार आहे. या दोन सदस्यीय पथकात एक डॉक्टर आणि एका आरोग्यतज्ज्ञाचा समावेश असेल.