मनीषा कंट्रक्शनकडून रस्त्याची चाळण ; आश्वासनांचा विसर
गुहागर : गुहागर – विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी मनीषा कंट्रक्शनने झोंबडी रस्त्यावर खडी मशिन प्लांट सुरू केला आहे. महामार्गाच्या कामासाठी याच ठिकाणाहून दिवसाला अनेक मोठी वाहने ये-जा करत असल्याने या मार्गाची दुर्दशा झाली आहे. परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून अनेकांना या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी निदर्शनास आणून देखील त्याकडे संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात आहे.
गुहागर – विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे. गुहागर तालुक्यातील महामार्गाच्या कामासाठी झोंबडी गावात मुख्य रस्त्यापासून एक किमी अंतरावर मनीषा कंट्रक्शनने खडी मशिन प्लांट उभारला आहे. दिवसभर शेकडो चार चाकी पासून वीस चाकीपर्यंत वाहने खडी डांबर व इतर सामानाची वाहतूक गेली वर्षभर करत आहेत. यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे परिसरात धूळ उडत आहे. या मार्गावर असलेल्या हॉटेल व घरांना धुळीचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी या रस्त्यावर डांबर टाकून देतो, असे आश्वासन दिले होते. मात्र, डांबर न टाकता रस्त्यावर अधून मधून केवळ पाणी मारले जाते. पण दुपारनंतर पुन्हा धुळ उडण्यास सुरुवात होते. गिमवी गावात काही महिन्यांपासून पोलीस व आर्मी भरतीचे प्रशिक्षण सुरू आहे. या धुळीमुळे येथील प्रशिक्षण वर्ग दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले आहे. हा प्रकार पाहता संबंधित ठेकेदाराने रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी राज्य उत्पादन विभागाचे माजी निरीक्षक सुभाष महादेव जाधव यांनी केले आहे.