ज्येष्ठ लेखक डॉ. आसाराम लोमटे यांचे मत
गुहागर : डान्सबार आणि त्या अनुषंगाने येणारे मुंबईतील विश्व; तिथे होणारी स्त्रियांची पिळवणूक आणि त्यांचे प्रश्न. घरातला कर्ता पुरुष डान्सबारमध्ये वाहत गेल्यानंतर कुटुंबाची होणारी वाताहत; अशी सगळी छानछोकी महानगरात परवडते. मुंबईत असा चंगळवाद असतानाच मराठवाड्याच्या दुष्काळी पट्ट्यात जगण्याची लढाई अतिशय तीव्र आहे. हे शहर आणि खेडे यातील विषमतावादी द्वंद्व ‘आरसा’ कादंबरीतून ईश्वर हलगरे यांनी समृद्धपणे रेखाटल्यामुळे मराठी साहित्याचा परीघ निश्चितच समृद्ध झाला आहे. असे मत ज्येष्ठ लेखक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आसाराम लोमटे यांनी व्यक्त केले.
दिनांक 13 रोजी ‘मराठी साहित्य वार्ता’च्या फेसबुक पेजवर ऑनलाइन पद्धतीने झालेल्या ईश्वर हलगरे लिखित ‘आरसा’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्या दरम्यान अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
‘आरसा’ कादंबरीचे प्रकाशन कणकवली येथील ज्येष्ठ कवी आणि पत्रकार अजय कांडर यांच्या हस्ते पार पडले. कांडर यांनी आपल्या मनोगतात ‘आरसा’मधून आलेल्या सर्वसामान्य माणसापासून दूर असलेल्या ‘तिसऱ्या’ जगाचा उल्लेख केला. तिसरे जग शोषणावर उभं असून ते डान्सबार आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या यंत्रणेला बळ देणारं आहे. ईश्वर हलगरे यांनी या तिसऱ्या जगाच्या मुळापर्यंत जाऊन तिथले प्रश्न समजून घेऊन ते तेवढ्याच ताकतीने कादंबरीच्या माध्यमातून मांडल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांची ही मांडणी मनोरंजनाच्या पातळीवर राहत नसून वास्तवाच्या पातळीवर येते. हे या कादंबरीचं महत्वाचं यश आहे.
या कादंबरीवर भाष्य करताना औरंगाबाद विद्यापीठातील प्रा. डॉ. कैलास अंभुरे यांनी या कादंबरीतून डान्सबारचं मूळ मराठवाड्यातपर्यंत आल्याने मराठवाड्यातील दुष्काळाच्या दहाकतेचं वेगळं वास्तव वाचकासमोर येतं, असं मत व्यक्त केले. आणि यातील प्रसंग चित्रपटाप्रमाणे एकामागून एक सरकत जात असल्याने कथानक खिळवून ठेवणारे आहे असेही ते आपल्या मनोगतात म्हणाले.
नांदेड येथील डॉ. विश्वाधार देशमुख यांनी कादंबरीच्या बलस्थानावर बोलताना पात्राचे सुसंवादी रूप व भाषेचा कलात्मक वापर यावर भाष्य केले. कादंबरीत आलेली मराठी हिंदी व बोलीचा कौशल्यपूर्ण वापर कथानकाच्या वाचनीयतेत भर घालणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी कादंबरीचे लेखक ईश्वर हलगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डान्सबारचा अनुभव घेतल्यानंतर खेड आणि शहर यातील विषमतेने आपण अस्वस्थ झाल्याचे व त्यामुळे या विषयावर लेखन केल्याचे नमूद केले. आपल्या लेखनाच्या माध्यमातून डान्सबारच्या यंत्रणेत अडकलेल्या स्त्रियांची घुसमट व त्यांचे प्रश्न उजागर करायचे होते असेही ते म्हणाले. आपल्या लेखनासाठी गुहागर येथील ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष कवी राजेंद्र आरेकर, लेखिका मनाली बावधनकर, बाबासाहेब राशिनकर, लोटिस्मा चिपळूणचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, कवी अरुण इंगवले, श्रीराम दुर्गे सर यांचे आवर्जून सहकार्य मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.
या कार्यक्रमात सूत्रसंचालन प्रा. मनाली बावधनकर यांनी केले. तर अक्षरवाङ्मय प्रकाशनाचे बाळासाहेब घोंगडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.