रत्नागिरी : जयगड येथील बेपत्ता झालेल्या नावेद- २ नौकेचे अवशेष शोधण्यासाठी मालकासह स्थानिक मच्छीमारांनी स्कूबा डायर्व्हसची मदत घेतली. त्यात समुद्रात तळात एक मच्छीमारी नौका रुतल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, नौका बेपत्ता प्रकरणी फतेहगड जहाजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समुद्रात दोन नॉटीकल मैल अंतरावर नांगर सापडलेल्या ठिकाणी अकरा मीटर खोलीवर ती नौका दिसल्याचा दावा मच्छीमारांनी केला आहे. त्यामुळे शासनाकडून त्या जागेची चाचपणी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नासीर हुसेनमिया संसारे (वय ५२, रा. जयगड, अकबर मोहल्ला) यांनी नावेद २ ही नौका बेपत्ता झाल्याची तक्रार २६ ऑक्टोबरला जयगड पोलिस ठाण्यात केली होती. नावेद या नौकेला खासगी कंपनीच्या मालवाहू जहाजाने धडक दिल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्याला अनुसरुन ‘फतेहगड’ या जहाजावरील कप्तानाकडून मध्यरात्रीच्या सुमारास एखादी वस्तू तरंगत जहाजावर धडकल्याचा संदेश बंदरावर पाठविला होता. हा प्रकार दोन नॉटीकल मैल अंतरावर घडल्याची नोंद झाली. याच परिसरात नावेदवरील नांगर आणि जाळी काही मच्छीमारांना सापडली.
नौका बेपत्ता प्रकरणी फतेहगड जहाजावर गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाई जयगड पोलिसांमार्फत सुरु आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाकडून म्हणावे तसे सहकार्य मिळत नसल्याने मच्छीमारांनी स्वतःहून शोध मोहीम सुरू केली होती. काही दिवसांपूर्वी नांगर सापडलेल्या भागात गुरुवारी (ता. ९) खासगी स्कूबा डायव्हर्सना पाण्यात उतरवण्यात आले. सकाळी १० वाजता ही शोध मोहीम सुरु झाली. यामध्ये चारजण सहभागी झाले होते. पोलिसांना माहिती दिली किनाऱ्यापासून एक तासाच्या अंतरावर आतमध्ये साधारणपणे दोन नॉटीकल मैलात शोध पथक उतरवण्यात आले होते. त्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी नावेदचे मालक श्री. संसारे यांना मदत केली आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ही मोहीम सुरु होती. समुद्राच्या तळात एक नौका अडकून असल्याचे स्कुबा डायर्व्हसना आढळल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली. मालवाहू जहाजाला धडकल्यामुळे ती वाळूत रुतली असावी, असा अंदाजही मच्छीमारांनी वर्तविला आहे. स्कुबा डायव्हर्स्कडून मिळालेली माहिती मच्छीमारांनी पोलिसांना दिली आहे. वाळूत असलेले अवशेष नावेदचेच आहेत का, याबाबत पडताळणी करणे आवश्यक आहे.