उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
गुहागर : अखेर गुहागर नगरपंचायतीघे नगराध्यक्ष राजेश बेंडल अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजीत पवार यांच्या उपस्थितत हा पक्षप्रवेश होणार आहे.
Finally, Guhagar Nagar Panchayat Mayor Rajesh Bendal will officially join the NCP. In the presence of Deputy Chief Minister and NCP leader Ajit Pawar the party is about to enter.


लोकनेते माजी आमदार कै. रामभाऊ बेंडल यांचे सुपुत्र राजेश बेंडल हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आहेत. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य, गुहागर पंचायत समितीचे सभापती होते. 2009 च्या गुहागर विधानसभा निवडणुकीत आमदार भास्कर जाधव यांच्या प्रचारामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. मात्र 2017 नंतर आमदार भास्कर जाधव आणि राजेश बेंडल यांच्यात विसंवाद सुरू झाला. त्यानंतर बेंडल काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहिले. 2018 मध्ये गुहागर नगरपंचायत निवडणुकीपूर्वी राजेश बेंडल यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन शहर विकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळवलेल्या राष्ट्रवादीचा केवळ एक नगरसेवक निवडून आला. याचे शल्य आजही आमदार भास्कर जाधव यांना जाणवते. पुढे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी मधील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत गेले. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला.


त्यानंतर खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुहागर मधील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली. या प्रक्रियेत राजेश बेंडल राष्ट्रवादीत सक्रिय झाले. परंतु त्यांनी पद घेण्यास नकार दिला. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात शहर विकास आघाडीचे स्वतंत्र अस्तित्व लक्षात येत होते.
सप्टेंबर महिन्यात खासदार सुनील तटकरे गुहागरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शहर विकास आघाडीच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या सौ. स्नेहा भागडे यांना गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. याच कार्यक्रमात तटकरे यांनी राजेश बेंडल यांना लवकरच अजितदादा च्या उपस्थितीत पक्षप्रवेश करून घ्या. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सक्रिय व्हा. असा जाहीर सल्ला दिला. गुहागर नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडणूका झाल्या. या निवडणुकीत गुहागर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या सौ. सुजाता बागकर यांना शिक्षण सभापती पद देण्यात आले. त्यानंतर पक्षप्रवेशाच्या विषयाला गती मिळाली. आता गुरुवारी (ता. 21) राजेश बेंडल यांच्या बरोबर कीती नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार याची उत्सुकता आहे.

