शिवसेना नेते अनंत गीते यांचे स्पष्टीकरण, शृंगारतळीत पदाधिकाऱ्यांची बैठक
गुहागर : राज्यातील आघाडी सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. आपण शिवसैनिक आहोत, आघाडी सैनिक नाही आहोत, असे स्पष्ट मत माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार अनंत गीते यांनी व्यक्त केले.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रविवारी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हापरिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर, जि.प. सदस्या सौ. नेत्रा ठाकूर, तालुकाप्रमुख सचिन बाईत, उपतालुकाप्रमुख बाबू सावंत, चिपळूण तालुकाप्रमुख संदीप सावंत, पंचायत समिती सदस्या सौ. पूर्वी निमूणकर, रविंद्र आंबेकर, शृंगारतळी शहरप्रमुख नरेश पवार, नारायण गुरव, पाटपन्हाळे सरपंच संजय पवार व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गीते पुढे म्हणाले, राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार असल्यामुळे आपण नेमके कुणाशी लढायचे असा प्रश्न सर्वांसमोरच आहे. या कारणाने शिवसैनिकांमध्ये काहीशी संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्यासाठी मी आलो आहे. हे सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहे. मात्र, आपण शिवसैनिकच आहोत, आघाडी सैनिक नाही असे स्पष्ट करुन आपण ताकद पुढील कोणत्याही निवडणुकांत स्वबळावर दाखविणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोठेही आघाडी झालेली मला पहायला मिळालेली नाही. तसे मी स्वबळावर लढावे असे आदेशही दिले होते. त्यामुळेच राज्यात शिवसेनेच्या ३ हजार ३०० इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती सेनेकडे ताब्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शिवसेनेचा जो शाखाप्रमुख माझ्याकडे येईल आणि मला बोलेल हा मेळावा माझ्या गावी घ्या, त्याचवेळी मी त्याच्या गावामध्ये मेळावे घेईन. कुणावरही जबरदस्ती मेळाव्याची करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक तालुक्यामध्ये मी असे मेळावे घेऊन प्रमुख कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी संभ्रमावस्था आहे ती दूर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. यावेळी गीते यांनी आघाडी सरकारमधील कोणत्याही नेत्यावर भाष्य केले नाही. मात्र, आज अनेक नेत्यांचे दौरे या तालुक्यात होणार होते मात्र, मी येणार हे समजल्यावर ते आलेले नसावेत, असेही त्यांनी उपरोधिकपणे सांगितले यावेळी त्यांनी आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवाचे कौतुक करुन असे महोत्सव शिवसेनेच्या माध्यमातून सर्वत्र होण्यासाठी आपण प्रयत्न करुया, असे सांगितले.