वळके येथे पहिली कार्यशाळा
रत्नागिरी : तालुक्यातील वळके गावाला चांगल्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती निसर्गतः लाभलेली आहे. गावाला बावनदीसारखी बारमाही वाहणारी नदी व सुपीक जमिन लाभली आहे. याचा वापर करून गावातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शासकीय योजनांचे लाभ घेतला पाहिजे. शाश्वत शेतीतून लखपती शेतकरी व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.
जिल्ह्यातील पहिली लखपती शेतकरी योजनेअंतर्गत कार्यशाळा वळके येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी ते म्हणाले, शासकीय योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर शेतकरी करून कोकणातील सर्व शेतकऱ्यांसमोर त्यांचा आदर्श तयार होण्यास मदत होईल. त्याकरिता शेतीतील नवीन आधुनिक तंज्ञज्ञान लागवड पद्धती, सेंद्रीय शेती, शेतीपूरक नवीन व्यवसायांची उभारणी यासाठी योजनांची माहिती घेऊन त्याद्वारे लाभार्थी व्हावे.
यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड म्हणाल्या, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवळ खरीप हंगामातील भात, नागली, रब्बी हंगामातील आंबा, काजू यांच्या सोबतीला सेंद्रीय शेतीतून विविध पिके घेऊन आर्थिक उन्नती साधली पाहिजे. रोहयोतील विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे. आता शेतकरी विविध योजनांसाठी पात्र ठरू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थी झाले पाहिजेत.
यावेळी रोहयो उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, जिल्हा मोहिम अधिकारी सुहास पंडित, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अभिजित कसालकर, गटविकास अधिकारी टी. बी. जाधव, उपविभागीय सूर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव, सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, सरपंच सौ. माधवी तांदळे उपस्थित होते.