मरण पावलेल्या कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार
गुहागर : गुहागर तालुक्यात कोरोनामुळे मरण पावणाऱ्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शृंगारतळी मधील पाच तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पुढाकार घेतला आहे. कोरोना काळात जीवावर उदार होऊन सामाजिक कार्य करणारे हेच ते खरे कोरोना योध्दा असे म्हटले जात आहे.
गुहागर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन रुग्ण संख्येबरोबरच या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. कोरोनामुळे मयत होणाऱ्या गुहागर तालुक्यातील रुग्णांवर अंत्यसंस्कार कोण करणार हा प्रश्न निर्माण होता. अशावेळी आरोग्य विभागाने शृंगारतळी येथील डॉक्टर राजेंद्र पवार व व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते नासीमशेठ मालाणी यांना फोन करून अंत्यसंस्कार करण्यासाठी माणसे पाहिजेत असे सांगितले होते. डॉ. पवार व मालाणी यांनी शृंगारी मोहल्ला येथील आसिम साल्हे, यासिन घारे, रज्जाक घारे, सिद्दीक घारे, जावेद केळकर या पाच युवकांना सदरील प्रकार सांगितला. ते क्षणात आपल्या जीवाची पर्वा न करता मयत कोरोनग्रस्त व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास तयार असल्याचे सांगितले.
शृंगारतळीतील या पाच तरुणांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वांनी कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी ते मढाळ येथील मयत कोरोना व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, येथील नागरिक अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार झाल्याने हा अंत्यसंस्कार करता आला नव्हता.