नवी दिल्ली – गुजरातमधील धोलावीरा या हडप्पाकालीन पुरातन शहराच्या अवशेषांचा देखील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोने केलेल्या ट्विटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
युनेस्कोच्या सध्या सुरू असलेल्या जागतिक वारसा स्थळांविषयीच्या कमिटीच्या 44 व्या सत्रामध्ये याबाबतचा निर्णय करण्यात आला. या कमिटीच्या या सत्रामध्ये तेलंगणमधील रुद्रेश्वर रामप्पा मंदिराचाही जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोच्या यादीमध्ये गुजरातमधील चंपानेर, रानी की वाव आणि अहमदाबाद या तीन ठिकाणांचा समावेश आहे. धोलावीरा या पुरातन शहराच्या अवशेषांनाही युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट केले गेल्याने आता या यादीत भारतातील 40 ठिकाणांचा समावेश झाला आहे.
भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 2014 सालापासून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये 10 नवीन स्थळांचा समावेश झाला आहे. असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.