धोपवे, वेलदुर, साखरी त्रिशुळ गावांना मोठा दिलासा
गुहागर : जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव यांच्या सुचनेनंतर तालुक्यातील धोपवे, वेलदुर, साखरी त्रिशुळ या गावांना आरजीपीपीएल कंपनीमार्फत पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांतील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
Following the suggestion of Zilla Parishad President Vikrant Jadhav, water tankers have been started in Dhopve, Veldur and Sakhari Trishul villages of the taluka through RGPPL company. Therefore, the people of these villages have got great relief.


श्री. विक्रांत जाधव हे दि. ७ मे रोजी गुहागर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील पाणी टंचाईबाबत पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक झाली होती. गुहागर तालुक्यासाठी शासकीय टँकर नसल्याने धोपवे, वेलदुर, साखरी त्रिशुळ आदी गावांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याची बाब समोर आली. दरवर्षी आरजीपीपीएल कंपनीकडून वेलदुर व अन्य गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, यावर्षी तो सुरू करण्यात आला नाही, अशी माहिती बैठकीत समोर आली. याची दखल घेऊन श्री. जाधव यांनी कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला आणि ताबडतोब टँकर उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्यानुसार १५ मे पासून हा टँकर सुरू करण्यात आला आहे.
गुहागर तालुक्यासाठी शासकीय टँकर नसल्याने खासगी टँकर उपलब्ध करून घ्यावा, अशी सूचना श्री. विक्रांत जाधव तसेच मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनीही प्रांताधिकारी श्री. प्रवीण पवार यांना केली होती. त्यावरही कार्यवाही करण्यात आली असून खासगी टँकर घेण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी गुहागर पंचायत समितीच्या दिले आहेत. तसे पत्रदेखील पंचायत समितीला प्राप्त झाले आहे. पाणी टंचाईच्या प्रश्नी गांभीर्याने लक्ष घालून टँकर उपलब्ध करून दिल्याबद्दल टंचाईग्रस्त गावांतील जनतेने श्री. विक्रांत जाधव यांचे आभार मानले आहेत.

