गुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवळी ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे विनायक मुळे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न. असेच सुत्र गेल्या काही निवडणुकांमध्ये राहीले आहे. मात्र राजकीय कुरघोडी करत विनायक मुळे यांनी गेली 15 वर्ष ग्रामपंचायत आपल्या गटाच्या ताब्यात ठेवली आहे. यावेळीही गावपॅनेल विरुध्द शिवसेना म्हणजेच मुळेभाऊंचा गट असेच चित्र निवडणूकीत पहायला मिळत आहे.
तळवली ग्रामपंचायतीच्या इतिहासात डोकावले तर एकेकाळी येथील निवडणूक मुळे विरुध्द चौगुले गट अशी रंगत असे. जवळपास १० वर्ष भाजपचे सुरेश चौगुले यांनी विनायक मुळे यांना कडवी टक्कर देत तळवळी ग्रामपंचायतीचे सरपंचपद राखले होते. त्यानंतर विनायक मुळे गटाची कारकीर्द सुरु झाली. 15 वर्ष सरपंच पद आपल्या गटाकडे ठेवताना त्यांनीही सरपंच म्हणून काम केले. त्यांची पत्नी सौ. विभावरी मुळे यांनी देखील सरपंचपद भुषवले. मुळे आणि चौघुले हे राजकीय वैरी असले तरी त्यांच्यात शत्रुत्त्व नव्हते. सुरेश चौगुलेंनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाच वर्ष काम केल्यानंतर हळूहळू राजकारणातून निवृत्ती घेतली. 2009 ला भास्कर जाधव यांना राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांची पत्नी सौ. विभावरी मुळे जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आल्या. त्यानंतर पंचायत समिती सदस्य म्हणूनही निवडून आल्या. सध्या त्या गुहागरच्या सभापती आहेत.
या पार्श्र्वभुमीवर तळवली ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. सध्याच्या सरपंच सौ. यशोदा सांगळे आणि उपसरपंच पवार ही दोघंही मुळेसमर्थक होती. मात्र या निवडणुकीत सरपंच उपसरपंच गावपॅनेल बरोबर आहेत. मुळे समर्थक गटाने आम्ही शिवसैनिक असा नारा दिल्याने ही निवडणूक शिवसेना विरुध्द गावपॅनेल अशी रंगणार आहे. गावपॅनेलमध्ये पक्षीय राजकारण बाजुला ठेवून सर्वांची मोट बांधली जात आहे. त्यामध्ये काही जुने शिवसैनिकही सामिल झाले आहेत.
आजचे गावातील वातावरण गावपॅनेलला पोषक आहे. मात्र आमदार भास्कर जाधव यांचे विश्र्वासु सहकारी असलेले मुळेभाऊ देखील राजकारणात मुरब्बी आहेत. डावपेचांमध्ये माहीर आहेत. संवादातून जिंकण्याची कला त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आज तळवलीमध्ये गावपॅनेलच्या बाजुने असलेले वातावरण प्रत्यक्ष मतदानापर्यंत टिकविण्यात गावपॅनेल किती यशस्वी होते त्यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.