गुहागर : रस्ता रुंदीकरणात शृंगारतळी बाजारपेठेतून भूमीगत केबल वाहिन्या टाकण्यासाठीचा सर्वे सुरु झाला आहे. या सर्व्हे बद्दल व्यापाऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
रस्ता रुंदीकरणात शृंगारतळी बाजारपेठेचा विषय समोर आला आहे. गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून शृंगारतळी ओळखली जाते. सर्वाधिक मोठी बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीत रस्ता रुंदीकरणात अनेक प्रश्न उभे ठाकले होते. मात्र, पाटपन्हाळे येथे गेल्या आठवड्यात झालेल्या अधिकारी व व्यापारी यांच्या बैठकीत हे प्रश्न सोडविले गेले. यामध्ये प्रामुख्याने वीजवाहिन्या, वीजखांब, पाणीपुरवठ्याची वाहिनी, बाजारपेठेतील रस्त्याची उंची आदी प्रश्नांची सोडवणूक या बैठकीत करण्यात आली. नुकताच भूमीगत वाहिन्यांची केबल टाकण्यासाठीचा सर्व्हे करण्यात आला.
यावेळी गुहागर महावितरणचे अभियंता गणेश गलांडे, अभियंता कलशेट्टी, पंचायत समिती उपसभापती सुनील पवार, सरपंच संजय पवार, शिवसेनेचे विभागप्रमुख अनंत चव्हाण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर, शहरप्रमुख नरेश पवार, ग्रा.पं. सदस्य अमरनाथ मोहिते, सत्यप्रकाश चव्हाण, दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते.