सुमित कांबळेचे यश ; मॅरेथॉनसाठी बनला स्वतःचाच मार्गदर्शक
गुहागर : हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना वेगळं काही तरी करावं म्हणून तो धावू लागला. सरावाचे वेळी अचानक पूण्यातील एका अर्ध मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. आत्मविश्र्वास वाढला आणि गेल्या तीन वर्षात प्रशिक्षक, मार्गदर्शकाविना 16 शर्यती पूर्ण केल्या. या स्पर्धात भाग घेताना क्षमता कशी टिकवायची, संतुलित आहात कोणता घ्यावा, प्रत्यक्ष धावताना उर्जा येण्यासाठी आपण कधी व कीती प्रमाणात उर्जा देणारे पेय घ्यावे आदी गोष्टी तो स्वत:च शिकला. या खेळाडूचे नाव आहे सुमीत कांबळे.
गुहागर हायस्कुलमधील शिक्षक, गृहरक्षक दलाचे तालुका समन्वयक सुधाकर कांबळे व कांबळे मॅडम यांचा मुलगा सुमीत. माध्यमिक शिक्षण झाल्यावर तो लोणावळा येथे हॉटेल मॅनेजमेंट शिकण्यासाठी गेला. तेथे तंदुरुस्तीसाठी त्याने धावण्याचा व्यायाम निवडला. सुरवातीला महाविद्यालयाच्या मैदानावर धावताना त्याला धावण्याचा छंद लागला. या छंदापोटी सुमित लोणावळ्यातील अनेक घाट रस्त्यांवर धावत असे. याच दरम्यान त्याने पुण्यातील अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली. गेल्या तीन वर्षात 8 अर्ध मॅरेथॉन ( 21 कि.मी.), 4 पूर्ण मॅरेथॉन (42 कि.मी.) आणि 3 अल्ट्रा मॅरेथॉन (50 कि.मी.) त्याने पूर्ण केल्या. नुकतीच त्याने सर्वाधिक 53 कि.मी.ची अल्ट्रा मॅरेथॉनही पूर्ण केली. आता मॅरेथॉनच्या वर्तुळात त्याला अल्ट्रा रनर म्हणून ओळखले जावू लागले आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यातली मॅरेथॉन स्पर्धेत त्याने सहभाग घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात एका संस्थेने 100 दिवस दररोज किमान 3 कि.मी. धावण्याची स्पर्धा ठेवली होती. देशातून 5794 स्पर्धक सहभागी झाले होते. सुमतीने कोकणातल्या मुसळधार पावसात 100 दिवसात 763 कि.मी. धावून देशात 222 वी तर महाराष्ट्रात 58 वी रँक प्राप्त केली. तसेच ऑलम्पिक संस्थेशी संलग्य असलेल्या संस्थेने खेळाडुंचे आहार नियोजनासंदर्भात (डाएट प्लॅन, हायड्रेशन, एनर्जी ड्रींक आदीचा समावेश) ऑनलाइन प्रशिक्षण आणि ऑनलाइन परिक्षेचे आयोजन केले होते. हा कोर्सही सुमीतने पूर्ण केला आहे.
याबाबत सुमती म्हणतो की, मॅरेथॉन धावणाऱ्या खेळाडूला ट्रॅक, त्यामधील चढ उतार, चालणे धावण्याची योजना, शरिर आणि उर्जेचा समतोल आदी गोष्टींचा विचार करावा लागतो. अनेकवेळा प्रत्यक्ष शर्यतीचे वेळी ठरवलेली योजना बदलावी लागते. शर्यतीपूर्वी, शर्यंतीनंतर कोणता आहार घ्यावा हे देखील शिकावे लागते. या सगळ्याचा माहिती घेवून माझा आहार तक्ता ( एनर्जी ड्रींक, मल्टी व्हिटॅमिन डाएट प्लॅन) मीच बनविला आहे. आजपर्यंत मॅरेथॉन पूर्ण करण्याचे लक्ष्य होते आता शर्यत जिंकण्यासाठी मला पळायचे आहे.